चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री यांना निवेदना मार्फत केली आहे.
जिल्ह्यात वीज ग्राहकांकडे प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्व्हे करण्यात येत आहे. वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर लावण्यासाठी ग्राहकांच्या घरोघरी जावून सर्व्हे करण्यात येत असून स्मार्ट मीटर लावणे एकप्रकारे बंधनकारक असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. ग्राहकांना वेठीस धरण्याच्या महावितरणच्या या धोरणाला दिनेश चोखारे यांनी विरोध दर्शविला आहे. हे प्रकार बंद न केल्यास आणि निर्णय रद्द न केल्यास जिल्ह्यात मोठं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, जनतेतील असंतोष लक्षात घेता उपमुख्यमंत्री आणि खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.