नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाचा टेकू घेऊन एनडीएचे सरकार स्थापन झाले. भाजपाला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये सर्वाधिक फटका बसला. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीने महायुतीची पुरती धुळधाण उडवली. महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळवता आला. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडूनही भाजपाला फायदा झाला नाही. या निवडणुकीनंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मधून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन सदर्य रतन शारदा यांनी भाजपाला चपराक लगावणारा एक लेख लिहिला आहे. “मोदी 3.0 : कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन” या शिर्षकासह लिहिलेल्या या लेखात लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपाला वास्तवाची जाणीव करून देणारा असल्याचे म्हटले. तसेच महाराष्ट्रात अजित पवार यांना सोबत घेतल्याची किंमतही भाजपाला मोजावी लागल्याचा टोला या लेखातून त्यांनी लगावला.
भाजपा आणि शिंदे गटाचे महाराष्ट्रात बहुमत असतानाही अजित पवार गटाला सोबत घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढणाऱ्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने स्वत:ची किंमत कमी करून घेतली, अशी घणाघाती टीका रतन शारदा यांनी केली.
अतिआत्मविश्वास नडला; संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी, RSS च्या कानपिचक्या
मोदींचा आरोप, दादांची कोलांटउडी
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र या सभेनंतर दोनच दिवसात अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार घेऊन थेट सत्तेत सहभागी झाले. एवढेच नाहीतर भाजपने त्यांना आपल्या वाशिंग मशीनमध्ये पवित्र करून घेत उपमुख्यमंत्रीपदही दिले.
महाराष्ट्रात 24 जागांचा फटका
दरम्यान, महाराष्ट्रात भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट यांची महायुती एकत्र निवडणूक लढली. मात्र या निवडणुकीत भाजपाला 9, शिंदे गटाला 7 आणि अजित पवार गटाला अवघी एक जागा मिळाली. गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने एकत्र 41 जागा जिंकल्या होत्या. मात्र फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण, तपास यंत्रणांचा गैरवापर, महागाई, बेरोजगारीवरील मौन यामुळे भाजपला 2019 च्या तुलनेत तब्बल 24 जागांचा फटका बसला.