अतिआत्मविश्वास नडला; संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी, RSS च्या कानपिचक्या

लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नसल्याचे विधान केले होते. याचा फटका भाजपला निवडणुकीत बसला आणि पूर्ण बहुमतापासून ते वंचित राहिले. आता निवडणूक संपल्यापासून आरएसएस सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी मर्यादा पाळल्या नाहीत’, असे विधान केले होते. तसेच मणिपूरकडेही लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. त्यांची ही वक्तव्य चर्चेत असतानाच आता दुसरीकडे ‘ऑर्गनायझर’ या संघाच्या मुखपत्रातून लोकसभा निवडणुकीच्या खराब कामगिरीवरून भाजपला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे मदत मागण्यासाठी आलेच नाहीत, असा दावा ‘ऑर्गनायझर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात करण्यात आला आहे. याचाच परिणाम म्हणून भाजपची एवढी खराब कामगिरी झाली. लोकसभा निवडणुकीचा हा निकाल अतिआत्मविश्वास असलेल्या भाजपाला वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. भाजपाचे नेते थेट मैदानात उतरून प्रचार करण्याऐवजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात धन्यता मानत होते, असा टोलाही यात लेखातून लगाविण्यात आला. तसेच भाजपाचे नेते आपापल्या कोषामध्ये आनंदात बसले होते. ते लोकांचे म्हणणे, समस्या ऐकून घेण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरलेच नाहीत, असेही यात नमूद करण्यात आले आहे. भाजपला कानपिचक्या देणारा हा लेख आरएसएसचे आजीव सभासद असलेल्या रतन शारदा यांनी लिहिलेला आहे.

प्रत्येक मुद्द्याला दोन बाजू असतात… सरसंघचालक मोहन भागवत यांनी मजबूत विरोधी पक्षाची गरज केली अधोरेखित

फक्त आम्हालाच राजकारण कळते आणि आरएसएससारख्या इतर संघटनेमधील लोकं अडाणी आहे असे मानणाऱ्या भाजपा नेत्यांचा अहंकार अत्यंत हात्स्यास्पद आहे. आरएसएस ही भाजपची मैदानी ताकद नाही. खरे तर जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपाकडे स्वत:चे कार्यकर्ते आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे, पक्षाचा अजेंडा समजावून सांगणे, प्रचार साहित्य व मतदार कार्डांचे वाटप करून नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत आणणे ही त्यांची जबाबदारी आहे. पण लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अतिआत्मविश्वास बाळगणाऱ्या आणि स्वत:च्या कोषात राहणाऱ्या भाजपा नेत्यांना, कार्यकर्त्यांना वास्तवाची जाणीव करून देणारा आहे, अशी खरमरीत टीका शारदा यांनी केली.

भाजपला रोखण्यात काँग्रेसपेक्षाही INDIA आघाडीतील प्रादेशिक मित्रपक्षांची ताकद अधिक! अशी आहे आकडेवारी

भाजपाचे नेते मैदानात उतरण्याऐवजी सोशल मीडियावर सेल्फी टाकून आणि मोदींच्या भरवशावर स्वत:च्या कोषात राहण्यात धन्यता मानत होते. त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून लोकांचे म्हणणे ऐकले नाही. तसेच जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून सोशल मीडियावरील सेल्फी स्टार कार्यकर्त्यांचा उदय झाल्याने भाजपावर त्याचा नकारात्मक परिणाम झाला, असा टोलाही त्यांनी लगावला.

एवढेच नाही तर भाजप कार्यकर्त्यांना आरएसएसकडे मदतीसाठी येण्याची गरज का वाटली नाही, याचा खुलासाही त्यांनी करावा. तसेच भाजप कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिकांना मंत्र्यांची भेट करत दूरच, पण आमदार, खासदारालाही भेटणे मुस्किल झाले आहे. लोकांच्या समस्यांबाबत उदासीन असणे हे देखील पराभवाचे कारण आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच मोदींच्या करिष्म्यालाही काही मर्यादा असल्याचेही त्यांनी म्हटले.