वाराणसीतून प्रियांका लढल्या असत्या तर मोदी 3 लाख मतांनी हरले असते

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाराणसीतून लढल्या असत्या तर नरेंद्र मोदी यांचा तब्बल 2 ते 3 लाख मतांनी पराभव झाला असता. एनडीए अयोध्यातच नाही तर काशीतही हरली आणि मोदी वाराणसीतूनही अक्षरशः थोडक्यात वाचले, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मी हे सर्व अहंकाराने बोलत नाही तर देशातील जनतेनेच मोदींना उत्तर दिले आहे, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर राहुल आणि प्रियांका गांधी जनतेचे आभार मानण्यासाठी आज पहिल्यांदाच रायबरेलीत पोहोचले. त्यावेळी ते बोलत होते.

मोदी आणि शहा देशाचा पाया कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या आत्म्याला समजले की, मोदी, शहांना देशाचे संविधान, पायाच बदलून टाकायचाय. त्यामुळे देश एनडीएविरोधात एकसंध झाला, असे राहुल गांधी म्हणाले.

3 हजारांहून अधिक कार्यकर्ते, 500 मीटरच्या रांगा

कडक उन्हात गेस्ट हाऊसच्या बाहेर तब्बल 3 हजारांहून अधिक कार्यकर्ते दाखल झाले. सुमारे 500 मीटरच्या लांबलचक रांगा लागल्या. गेस्ट हाऊसकडे जाणाऱया रस्त्यावर 2 किलोमीटर लांब जाम होते. गेस्ट हाऊसभोवती राहुल आणि प्रियंका गांधी यांची पोस्टर्स लावण्यात आली होती.