मराठवाड्यात मृगबहार, सर्वदूर पाऊस; शेतशिवारात पेरण्यांना वेग

दुष्काळ वणव्यात होरपळणार्‍या मराठवाड्यावर मृगबहार झाली आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस झाला असून, शेतशिवारात खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. दोन दिवसांत मराठवाड्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी पावसाने दगा दिल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट ओढवले. भूजल पातळी खालावली. खरिपाला पावसाने ओढ दिली, तर रबीचे अवकाळीने मातेरे केले. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला होता. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली. त्यामुळे शेतकर्‍यांनी उत्साहाने पेरणीपूर्व मशागत केली. शेतकर्‍यांच्या उत्साहात वरुणराजाही सहभागी झाला. कित्येक वर्षांनंतर मृग नक्षत्राचे मुहूर्त साधून पावसाने शेतशिवारात धूमशान केले. गेल्या २४ तासांत लातूर जिल्ह्यात साधारण ६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १४८ मिमी पाऊस तांदुळजा येथे झाला. रात्री झालेल्या जोरदार पावसात नळेगाव येथे तात्पुरता उभारण्यात आलेला पूल वाहून गेला. पानगावच्या डांबरी रस्ताही पहिल्याच पावसात वाहून गेला. पहिल्याच पावसात रेणा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जिल्ह्यात १०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धो-धो पडणार्‍या पावसामुळे बीड जिल्ह्यात मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी पेरता होत आहे. बहुतांश भागांत कापूस लागवडही सुरू झाली आहे. शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण पसरले आहे. धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कापसाच्या लागवडीला वेग आला आहे.