यजमान अमेरिकेने अनपेक्षितपणे शिकार केल्यानंतर हिंदुस्थानविरूद्धही पराभूत झालेल्या पाकिस्तानी संघावर आता टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये गट फेरीतच संकटात सापडलाय. कारण उद्या कॅनडाविरुद्ध ‘जिंका नाहीतर बॅगा भरा’ अशी पाकिस्तानची अवस्था झाली आहे. साखळीतच बाद होण्याच्या उंबरठयावर असलेल्या पाकिस्तानसाठी आता पुढील प्रत्येक सामना हा त्यांच्या अस्तित्वाची लढाई असेल.
हिंदुस्थानला 119 धावांवर रोखल्यानंतर पाकिस्तानला विजयाची संधी होती. मात्र, हिंदुस्थानच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीपुढे हा संघ 113 धावांत गारद झाला. न्यूयॉर्कच्या त्याच मैदानावर आता पाकिस्तान कॅनडाशी भिडणार आहे. कॅनडाचा संघ ‘अ’ गटातील एक दुबळा संघ असला, तरी या संघाने आयर्लंडसारख्या संघाला पराभवाचा धक्का दिलेला आहे. हे पाकिस्तानला विसरून चालणार नाही.
नाणेफेकीचा काैलही महत्त्वाचा
न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमची ड्रॉप-इन खेळपट्टी ही फलंदाजांसाठी कदर्नकाळ ठरत आहे. उसळीमुळे वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असलेल्या या खेळपट्टीवर नाणेफेकीचा काwलही महत्त्वाचा ठरणार आहे. कॅनडाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतल्यास पाकिस्तानी फलंदाजांचाही या खेळपट्टीवर कस लागणार आहे. कारण कॅनडाकडेही वेगवान गोलंदाजांची फौज आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी उद्याची लढाई वाटते तितकी सोपी नक्कीच नसेल, एवढे नक्की.
…तरच पाकिस्तान सुपर एटमध्ये
पाकिस्तानला टी-20 वर्ल्ड कपची सुपर-एट गाठण्यासाठी आता केवळ अल्लाहला साकडे घालावे लागणार आहे. त्यांचा सुपर एट प्रवेश अवघड असला तरी अशक्य नाही. त्यासाठी फक्त अमेरिकेला हिंदुस्थान आणि आयर्लंडविरुद्ध दारुण पराभूत व्हावे लागेल. हीच मागणी हिंदुस्थानी संघासाठीही करावी लागेल. सोबत त्यांना आयर्लंड आणि पॅनडाविरुद्ध महाविजय नोंदवावे लागतील. हे सारे घडून आले तर ते सुपर एटचे स्वप्न रंगवू शकतात. अशा गोष्टी फक्त चमत्कारातच होऊ शकतात. पाकिस्तानला आता फक्त चमत्कारच वाचवू शकतो.