aकुर्ला येथे एका व्यावसायिकासोबत विचित्र घटना घडली. चार जण व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसले आणि त्यातील एकाने गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाचे अपहरण केले. न घेतलेल्या पैशांसाठी हा प्रकार घडल्याचा आरोप व्यावसायिकाने तक्रारीत केला आहे. आरोपींनी मारहाण व शिवीगाळ करून किमती साहित्य काढून घेतले. याप्रकरणी विनोबा भावे पोलीस ठाण्यात चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असद अन्वर हुसेन फारुकी (21) असे तक्रारदाराचे नाव असून तो शीव पूर्व येथील रहिवासी आहे. त्याचा डिजिटल मार्पेटिंगचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री फारुकी त्यांच्या कुर्ला कोहिनूर मॉलमधील कार्यालयात असताना त्याचा मित्र इमाम व मित्राच्या ओळखीचे अन्य तिघे आत शिरले. त्यातील एकाने आपण गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याचे सांगून फारूकी याला मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने कार्यालयातील संगणक घेतले आणि इमामला गुन्हे शाखेच्या कार्यालयात घेऊन जात असल्याचे सांगून अन्य साहित्य सोबत घेण्यास सांगितले.
गाडीत बसवून आरोपीने त्याला वाशी, सानपाडा, बेलापूर असे फिरवले. तेथे गाडीत मारहाण करून फारुकीकडील आयपह्न, मॅकबुक, पॅनकार्ड, चालक परवाना अशा वस्तू काढून घेतल्या. याप्रकरणी व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीनंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी इमाम हा फारुकीचा मित्र आहे. दोघांनी मिळून यापूर्वी व्यवसाय सुरू केला होता, पण फारुकीने नंतर स्वतंत्र कारभार सुरू केला. या व्यवसायातून बाहेर पडल्यानंतर इमाम त्याच्याकडे पैशांची मागणी करत होता, परंतु पैसे घेतलेच नाही तरी इमाम एक लाखाची मागणी करत असल्याचे फारुकीचे म्हणणे आहे.