‘नीट’च्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान, श्रेणी गुण पद्धत रद्द करून पुन्हा परीक्षा घ्यावी; देशभरातील 20 हजार विद्यार्थ्यांची याचिकेतून मागणी

वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’च्या निकालाविरोधात देशभर तीव्र पडसाद उमटले असतानाच विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नीट परीक्षेतील घोटाळ्याचा देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर श्रेणी गुण पद्धत रद्द करून पुन्हा नीट परीक्षा घेण्याबाबत निर्देश द्या, अशी विनंती 20 हजार विद्यार्थ्यांनी याचिकेतून केली आहे. याबाबत आता न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजस्थान-कोटा येथील शिक्षणतज्ञ नितीन विजय यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. ‘नीट-युजी’ परीक्षेतील गैरप्रकार तसेच  ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने घाईघाईने जाहीर केलेला निकाल यावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवत कोटा येथील मोशन एज्युकेशन संस्थेने डिजिटल सत्याग्रह सुरु केला. त्यांच्या मोहिमेला देशभरातील विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला असून त्यापैकी 20 हजार विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयातील लढयात सहभाग घेतला आहे.

‘नीट’ परीक्षेतील घोटाळय़ाची चौकशी करा

डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना ’नीट’  परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला आहे त्यामुळे ’नीट’ परिक्षेतील घोटाळा पाहता या प्रकरणाची सर्वंकष   चौकशी करावी तसेच निकालाचे फेरमूल्यांकन करावे, अशी मागणी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली  या परिक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे याकडे पटोले यांनी लक्ष वेधले आहे.

विद्यार्थ्यांनी याचिकेतून उपस्थित केलेले प्रश्न

‘नीट’च्या परीक्षेत नकारात्मक गुण पद्धत आहे. परीक्षेतील सर्व प्रश्न सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न चुकला तरी 720 पैकी 715 गुण मिळणे अपेक्षित आहे. असे असताना विद्यार्थ्यांना 718, 719 गुण कसे दिले आहेत?

नीट परीक्षेसंबंधी परिपत्रक वा निकालपत्रात ग्रेस गुणांची तरतूद नाही. ज्यांनी तक्रार केली, त्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार केली नाही, त्यांचा काय दोष?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने निकालाची संभाव्य तारीख 14 जून रोजी जाहीर केली होती. मग अचानक 10 दिवस आधीच निकाल जाहीर करण्याचे कारण काय?

पेपर उशिरा देण्यात आला, त्यातील वेळेचा फरक लक्षात घेऊन तितका अधिक वेळ देता आला असता. मात्र कुठलीही तरतूद नसताना अतिरिक्त गुण कसे दिले?