मणिपूर गेल्या वर्षभरापासून तेथे शांतता प्रस्थापित होण्याची वाट बघते आहे. येथील हिंसाचार कुठल्याही परिस्थितीत थांबायला हवा. त्याला सर्वप्रथम प्राधान्य द्यायला हवे, अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारचे कान टोचले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने निर्णयांचा धडाका लावलेला असताना मणिपूर अद्याप अशांत आहे. मोदींनी आता तरी मणिपूरमध्ये शांतता नांदावी यादृष्टीने ठोस पावले उचलायला हवीत, असा संदेशच भागवत यांनी दिला आहे.
कुठल्याही प्रश्नावर दोन्ही बाजूंनी चर्चा व्हावी यासाठीच संसदेत दोन पक्ष आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग, खोटे पसरवणे अत्यंत चुकीचे आहे. निवडणुकीच्या धामधुमीतून आता बाहेर येऊन देशासमोर सध्या असलेल्या समस्या, प्रश्न यांच्यावर विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. निवडणुका संपल्या असून निकालही समोर आलेत. सरकारही बनले, सर्वकाही संपन्न झाले; परंतु यावर अद्याप चर्चा सुरु आहे. जे झाले ते का झाले, कसे झाले आणि काय झाले या गोष्टी म्हणजे लोकशाहीत प्रत्येक पाच वर्षात घडणाऱ्या घटना आहेत. आम्ही आमचे कर्तव्य करत आहोत, दरवर्षी करतो, प्रत्येक निवडणुकीत करतो. यावेळीही मी माझे कर्तव्यच करत आहे, असेही मोहन भागवत म्हणाले.
जुनी संस्कृती नष्ट होतेय
वर्षभरापासून मणिपूर शांततेची वाट बघत आहे. त्याआधी 10 वर्षे मणिपूर शांत होते. जुनी संस्कृती नष्ट झाल्याचेच हे द्योतक आहे. इथे जी आग लागली होती ती अजून धुमसत आहे. सगळे उद्ध्वस्त झालेय. त्यामुळे येथे शांतता कशी प्रस्थापित होईल यावर विचार करायला हवा असे मोहन भागवत म्हणाले.