Modi Cabinet Portfolio : नितीन गडकरी सुसाट! खातेवाटपात परिवहन खाते कायम

केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारचे खातेवाटप जाहीर झाले असून महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांचे परिवहन खाते कायम ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरी यांच्या खात्याला दोन ज्युनिअर मंत्री देण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यात मध्य प्रदेशातील भाजपचे अलमोरा येथील खासदार अजय तामटा आणि दुसरे पूर्व दिल्ली मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेले भाजपचे खासदार हर्ष मल्होत्रा हे दोन ज्युनिअर मंत्री असणार आहेत.

केंद्र सरकारमधील अत्यंत महत्त्वाच्या खात्यांपैकी एक असलेले परिवहन मंत्रालाय मित्रपक्षांना देणार नसल्याचे भाजपमधील सूत्रांनी आधीच सांगितले होते. या मागचे कारण म्हणजे नितीन गडकरी यांनी रस्ते विकासाचा जो वेग मागच्या सरकारमध्ये ठेवला तो वेग या सरकारमध्येही कायम ठेवायचा असल्याचे खातेवाटपापूर्वीच भाजपच्या सूत्रांनी म्हटले होते.

नितीन गडकरींच्या काळात राष्ट्रीय महामार्ग विकासाचा वेग हा 143 टक्क्यांनी वाढला आहे, असे केंद्र सरकारच्या आकडेवारीतूनच समोर आले आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नितीन गडकरी यांनी नवीन कार मूल्यांकन ( New Car Assessment Programme ) यंत्रणा आणली. यासोबतच नितीन गडकरी यांनी या निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्ट्रीक केली आहे. नितीन गडकरी हे 1.37 लाख मतांच्या फरकाने जिंकून आले आहेत.

संसदेचे पावसाळी अधिवेशन कधीपासून सुरू होणार याची तारिख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र संसदेचे नवीन अधिवेशन हे पुढच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर अधिवेशन सुरू होईल, असे मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येत आहे.