लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झंझावाती दौरे आणि जाहीर सभा घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तधारी महायुतीला धूळ चारली. यामुळे शिवसेनेत उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेना भवनात प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली.
महाराष्ट्राने भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना रोखलेलं आहे. नरेंद्र मोदींचं बहुमत खाली आणण्यामध्ये किंवा भारतीय जनता पक्षाला बहुमतमुक्त करण्यामध्ये महाविकास आघाडीचं अन् महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे. आज शिवसेना भवनामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, प्रमुख नेते, आमदार, खासदार, मुंबईचे विभागप्रमुख यांची बैठक झाली. या बैठकीत संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यासंदर्भात चर्चा झाली. विधानसभा निवडणुका आम्ही महाविकास आघाडीत एकत्रितपणे ताकदीने लढू. मात्र, 288 मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बांधणी होणं गरजेचं आहे, यासंदर्भातल्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. कोकण पदविधर, शिक्षक मतदारसंघ, मुंबईतील पदविधर आणि शिक्षक मतदारसंघ असतील, त्या संदर्भातल्या तयारीचाही आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
महाविकास आघाडीतूनच आम्ही निवडणुका लढवू आणि महाराष्ट्राची सत्ता काबीज करू. मात्र त्यासोबतच 288 मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बांधणी आज आहे त्या पेक्षा अधिक ताकदीने आणि मजबुतीनं होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने कामला लागा, अशा सूचना जिल्हाप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. एखादी जागा लढू अथवा ना लढू. मात्र, तिथे संघटना मजबुतीने दिसली पाहिजे आणि राहिली पाहिजे, असे संजय राऊत यांनी पुढे सांगितले.
महाविकास आघाडीने एकत्रित येऊन भाजपला दिल्लीतून बहुमतमुक्त केलं. तीच महाविकास आघाडी महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असे आम्ही तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून ताकदीने लढू. आणि विधानसभेच्या 180 ते 185 जागा जिंकू, अशा प्रकारचा निर्धार आजच्या शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला, असे संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे पुन्हा दौऱ्यावर
पावसामुळे कदाचित जाहीर सभा घेता येणार नाहीत. मात्र, पावसाळा असला तरी संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पूर्व तयारी म्हणून इंडोअर बैठका घेतल्या जाणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात इंडोअर मेळाव्यांचं आणि बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे आणि त्याची तयारी सुरू आहे. लवकरच तारखा जाहीर होतील, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.