मला मंत्रिपदावरून हटवा; केरळमध्ये BJP चं खातं उघडणाऱ्या खासदाराने असं का म्हटलं?

नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची म्हणून शपथ घेतली आणि पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली. मोदींच्या शपथविधीनंतर 71 खासदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान या भव्य सोहळ्यात पहिल्यांदाच केरळमध्ये भाजपला विजय मिळवून देणारे केरळचे भाजप खासदार सुरेश गोपी यांनीही राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र राज्यमंत्री म्हणून त्यांचे पुढील काही दिवस हे शेवटचे असण्याची शक्यता आहे. कारण शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सुरेश गोपी हे प्रचंड चर्चेत आहेत.

त्रिशूर मतदारसंघातून विजयी झालेले अभिनेते-राजकारणी सुरेश गोपी यांनी इतिहास रचला आणि केरळमधून भाजपचे पहिले लोकसभा खासदार बनले. पण मंत्रिपदाची शपथ घेताच पक्ष लवकरच आपल्याला या पदावरून हटवेल, असे वक्तव्य त्यांनी केले आणि ते चर्चेत आले. मला खासदार म्हणून काम करायचे होते. पण मला राज्यमंत्री व्हायचे नव्हते. त्यामुळे मला राज्यमंत्रिपद नको, असे मी पक्षाला आधीच सांगितले होते. मला वाटते की पक्ष मला लवकरच पदावरून हटवेल. मी एक अभिनेता आहे. मी अनेक चित्रपट साइन केले आहेत. त्यामुळे सध्या मला चित्रपट करायचे आहेत, असे ते म्हणाले.

अभिनेते-राजकारणी सुरेश गोपी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सुरेश गोपींच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. याबाबात काँग्रेसने ट्विट केले आहे. ‘अभिनेता आणि खासदार सुरेश गोपी यांनी रविवारी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि आज त्यांना हे पद सोडायचे आहे. कारण त्यांना चित्रपट करायचे आहेत. तुम्ही मतदारांची चेष्टा करताय का? तुम्ही तुमच्या खासदाराला आधीच का सांगत नाही की त्यांना काय करायचे आहे ते? मुख्य म्हणजे संविधान आणि देवाच्या नावाने शपथ घेतल्यानंतर त्यांनी मीडियासमोर येऊन दिखावा करू नये’, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.