सोलापूर शहर व जिह्यात धुवाँधार पावसाने हजेरी लावली आहे. शहराला दीड तास झोडपलेल्या पावसामुळे रस्त्यांना तळ्याचे रुप आले होते. अनेक नागरी वस्त्यात पाणी शिरल्याने घरासह प्रापंचिक वस्तुंचे नुकसान झाले. ग्रामीण भागातही सर्वदूर पाऊस होता.
सोलापूर शहर व जिह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. रविवारी संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी बरसत होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास जवळपास दीड तास पावसाने झोडपले. त्यामुळे मोरामणीसह होटगी रोड, कुंभार वेस, मेकॅनिक चौकसह अनेक सखल भागात आणि रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी साचलेले होते. अनेकांची वाहने या पाण्यात अडकून पडली होती. रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, अनेक झोपडपट्टीत सखल भागात नागरी वस्तीत पावसाचे पाणी घरात शिरल्याचे चित्र होते. यामुळे अनेक कुटुंबांची तारांबळ उडाली. प्रापंचिक सामानाचे नुकसानही झाले.
याबरोबरच अकलूज, माळशिरस, सांगोला, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर आदी तालुक्यांतही जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचलेले होते. तर अनेक नाले व ओढेही भरून वाहत होते. या पावसामुळे शेतकऱयांना समाधान मिळाले असून, पेरणीच्या तयारीला वेग आला आहे. खरीपाच्या पेरणीस पडलेला पाऊस अनुकूल ठरला आहे. यंदाच्यावर्षी पावसाने लवकरच हजेरी लावली आहे. गेल्या वर्षी 24 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते, तर यावर्षी 6 जूनलाच आगमन झाले आहे. मागील वर्षी कमी पाऊस पडल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचे संकट उभारले होते.