पावसाचा इशारा असतानाही भाजप मिंधे चालवत असलेल्या महापालिका सज्ज नव्हत्या, आदित्य ठाकरे यांनी फटकारले 

मुंबईत झालेल्या पाहिल्याच मुसळधार पावसाने मुंबईकरांची पार वाट लावली. अनेक भागात पाणी साचल्याने लोकांचे खूप हाल झाले. पाहिल्याच पावसात ही अवस्था असल्याने पुढे काय असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. दरम्यान हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असतानाही मिंधे भाजप सरकार त्या साठी सज्ज नव्हते हे दिसून आले. त्यावरून शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या घटनाबाह्य सरकारला फटकारले आहे.

“पहिल्याच पावसाने मुंबईतील अनेक भाग जलमय झाले आहेत, असेच दोन दिवसांपूर्वी पुण्यात झाले होते. या शहरांचा कारभार पाहणारे पालिका अधिकारी आणि इतर यंत्रणा कुठे आहेत, हा खरा प्रश्न आहे. महापालिकेत जनतेने निवडून आणलेले प्रतिनिधी नगरसेवक नसल्याने या यंत्रणा वाऱ्यावर पडल्या आहेत आणि लोकांच्या समस्या पासून दूर आहेत. सामान्यतः लोकांच्या समस्या बाबत पायाभूत सुविधा देणार्‍या यंत्रणा आणि सेवा पुरवठादार यांच्याशी समन्वय साधला जात असतो. पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून पंप लावले जातात आणि पावसाळ्या आधी ते सक्रिय केले जातात. पण यंदा पहिल्याच पावसाने मुंबई आणि पुण्यात पाणी साचले आहे. हवामान खात्याने अंदाज ववर्तवला असतानाही भाजप-मिंधे सरकार चालवत असलेल्या या महानगरपालिका पावसासाठी बिल्कुल सज्ज नव्हत्या असे दिसून आले ” अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजप मिंधे सरकारला फटकारले.