पवईतील झोपडपट्टी रिकामी करण्याची कारवाई कोणाच्या सांगण्यावरून? काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाची चौकशीची मागणी 

पवईतील जय भीम नगर झोपडपट्टी रिकामी करण्यासाठी कारस्थान रचण्यात आले असून कोणाच्या सांगण्यावरून ही कारवाई केली जात आहे. झोपडपट्टीतील गोरगरिबांना अमानुष मारहाण करून काही महिलांचा विनयभंग झाला आहे. हे गुंड कार्यकर्ते लांडे नावाच्या व्यक्तीचे आहेत. यामुळे महिला आयोग, मानवी हक्क आयोगाने हस्तक्षेप करून या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने पवईतील जय भीम नगर झोपडपट्टीतील बेकायदेशीर बांधकामांवर गुरुवारी कारवाई करताना पोलीस आणि महापालिका अधिकाऱयांवर हल्ला झाला. नोटीस बजावूनही या झोपडय़ा हटवण्यात आल्या नसल्याने ही कारवाई करण्यात आली. मात्र अतिक्रमण हटवताना संघर्षाला हिंसक वळण लागले. रहिवाशांनी केलेल्या दगडफेकीत महापालिकेचे पाच अभियंते, मजूर आणि काही पोलीस कर्मचारी जखमी झाले तर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये काही रहिवाशीदेखील जखमी झाले. मात्र त्यानंतर पोलिसांनी घरात घुसून दगडफेक करणाऱयांविरोधात कारवाई केली. ही कारवाई करताना पोलिसांनी काही तरुणांना काठीने मारहाण केली.

झोपडपट्टी रिकामी करून देण्यासाठी केवढी ही धडपड?

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल करून गरिबांवर हा अमानुष अत्याचार कुणी का म्हणून सहन करावा, डोक्याला रुमाल बांधून तरुणाला मारहाण करणारा हा माणूस कोण आहे? झोपडपट्टी रिकामी करून देण्यासाठी केवढी ही धडपड? याची चौकशी होणार की नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.