दोन आठवडय़ांपूर्वी भोसरीतील शांती नगर येथे पाच बांगलादेशी घुसखोरांना जेरबंद केल्याची घटना ताजी असतानाच आता मोशी येथेही बनावट कागदपत्रांसह बेकायदेशीररित्या राहणाऱया दोन महिलांसह चार बांगलादेशी नागरिकांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने जेरबंद केले. या कारवाईमुळे शहरात बांगलादेशींचा सुळसुळाट झाला असून त्यांचे सर्रासपणे बेकायदा वास्तव्य असल्याचे निष्पन्न झाले येत आहे.
भोसरीतील शांती नगर येथे 25 मे रोजी दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून पाच बांगलादेशी घुसखोरांना जेरबंद केले होते. पोलिसांच्या तपासात घुसखोरांपैकी एकाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर त्याने 2019मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही मतदान केल्याचे समोर आले होते. याशिवाय त्याच्यासह आणखी एकाने पासपोर्टचा वापर करून विमानाने बांगलादेशची वारी केल्याचेही निष्पन्न झाले होते.