अभिनेत्री शबाना आझमी यांची मद्याची ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक… ड्राय डेच्या दिवशी ऑनलाईन दारू खरेदी पडले महाग… अॅपवरून मागवलेल्या दारूमुळे बँक खाते झाले रिकामे… अशा घटना वारंवार घडूनही मुंबईसह राज्यात सध्या वेगवेगळ्या ऑनलाईनच्या माध्यमातून व्हिस्की, रम, व्होडकापासून बीयरचे टीन थेट घरपोच येत आहेत. वास्तविक ऑनलाईन दारू विक्रीवर बंदी आहे. पण तरीही सरकारच्या नाकावर टिच्चून ऑनलाईन मद्याची विक्री सर्रास सुरू आहे.
कोरोना काळात वाईन शॉपमध्ये गर्दी नको म्हणून घरपोच मद्य पोहोचवण्यास काही काळापुरता परवानगी देण्यात आली होती. पण याचा फायदा घेत विविध कंपन्यांनी शक्कल लढवली आणि अॅपच्या माध्यमातून दारू घरपोच पोहोचवण्यास सुरवात केली. याला मद्यप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद दिला. अनेक वाईन शॉप रात्री दहानंतर बंद होतात. मात्र रात्री उशिरापर्यंत पाटर्य़ा रंगतात. अशा वेळेस मद्य कमी पडले तर मग ऑनलाईन मागवले जाते. सध्या दोन ते तीन प्रमुख अॅपच्या माध्यमातून घरपोच दारू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अॅपवर ऑर्डर दिल्यावर एका तासात दारूची बाटली घरपोच येते. या अॅपवर दारू मागवण्यापूर्वी मद्य परवान्याचा (लिकर परमीट) नंबर द्यावा लागतो. मग ऑर्डर स्वीकारली जाते. पण एखादा अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी जवळच्या नातेवाईकाच्या मद्य परवान्याचा नंबर त्यावर टाकून सहजपणे दारू घरपोच मागवू शकतो. ऑनलाईन दारू पुरवणाऱ्या कंपन्या ऑर्डर देणाऱ्या ग्राहकाच्या वयाची पडताळणी करू शकत नाहीत. घरी बाटलीची डिलिव्हरी देण्यासाठी येणारा डिलिव्हरी बॉय कोणत्याही ग्राहकाच्या वयाच्या पुराव्याची पडताळणी करत नाही. पैसे मिळाल्यावर डिलिव्हरी बॉय निघून जातो.
शबाना आझमींमुळे चर्चा
ऑनलाईन मद्य मागवताना अनेक जणांची मोठय़ा प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी मद्य ऑनलाईन बुक केले. पैसे भरूनही मद्य घरपोच आले नाही. त्यानंतर त्यांनी ट्विट करून या फसवणुकीची माहिती दिली. अशी अनेकांची फसवणूक होते. पण अनेक जण तक्रारच नोंदवत नाहीत. त्यामुळे अशा ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे उघड होत नाहीत.
वाईन शॉपमधील दारू विक्रीची आकडेवारी उत्पादन शुल्क विभागाकडे असते. पण ऑनलाईन दारू विक्रीचा कोणताही डेटा उपलब्ध नाही.
वास्तविक अॅपच्या माध्यमातून दारूची विक्री करण्यास राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने किंवा राज्याच्या कोणत्याही संबंधित विभागाने अधिकृतपणे परवानगी दिलेली नाही; पण तरीही खुलेआम अॅपच्या माध्यमातून दारूची विक्री सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी खासगीत मान्य करतात.
हल्ली ऑनलाईन दारू विक्रीच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. पण सरकारी यंत्रणा या ऑनलाईन फसवणुकीला आळा घालू शकत नसल्याचे उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी मान्य करतात.