मुंबईला पाणीपुरवठा होणाऱया सातही तलावांत केवळ 6 टक्के पाणी शिल्लक राहिल्यामुळे जलसंकट ओढावले असताना मुंबई-ठाण्यात उद्यापासून मंगळवारपर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शिवाय कोकणात डेरेदाखल होऊन जोरदार बरसणारा मान्सून दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवल्याने मुंबईला पाणीपुरवठा होणाऱया ठाणे, पालघर आणि नाशिकमधील धरणांमध्येही पाणीसाठा वाढण्याची आशा निर्माण झाल्याने जलसंकटात ‘वरुणराजा’ची कृपाच झाली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा होणाऱया सात तलावांत केवळ 88 हजार 679 दशलक्ष लिटर पाणी शिल्लक असून दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटर पाणी पाहता केवळ 23 दिवसांना पुरणारा आहे. त्यामुळे मुंबईसाठी पाण्याचे टेन्शन निर्माण झाले आहे, मात्र आता मान्सून सक्रिय होत असल्याने दिलासा निर्माण झाला आहे. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा सुरू राहण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी 14,47,363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. यानुसार वर्षभराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाते. मुंबईत गेल्या काही वर्षांपासून जून महिन्यात तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळे 10 ते 20 टक्के पाणीकपात केली जात आहे. 2022 मध्ये 17 ऑक्टोबरपर्यंत मान्सून बरसत होता, मात्र 2023 मध्ये 29 सप्टेंबर रोजी पाऊस पडणे बंद झाले. यामुळे दरवर्षी वाढीव 5 ते 7 टक्के जादा मिळणारे पाणी या वर्षी मिळालेच नाही, पण 1 ऑक्टोबरपासून पाण्याचा वापर मात्र सुरू राहिला. यामुळे या वर्षीदेखील तलावांतील पाणीसाठा 9 टक्क्यांवर गेल्यानंतर 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू केली आहे.
सध्या मदार राखीव कोटय़ावर
तलावांनी तळ गाठल्यामुळे या वर्षी राज्य सरकारच्या अखत्यारीतील अप्पर वैतरणा धरणातून 93 हजार 500 मिलियन लिटर व भातसा धरणातून 1 लाख 37 हजार मिलियन लिटर राखीव पाणीसाठा वापरला जात आहे. हे पाणी जुलैपर्यंत पुरणारे असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
मुंबईला पाणीपुरवठा होणाऱया तलावांतील पाणीसाठा घटला असला तरी राखीव साठा असल्यामुळे सध्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीकपात केली जाणार नाही.
– भूषण गगराणी, पालिका आयुक्त
तीन वर्षांची 8 जूनची स्थिती
2024 88679 दशलक्ष लिटर 6.13 टक्के
2023 157814 दशलक्ष लिटर 10.90 टक्के
2022 212462 दशलक्ष लिटर 14.68 टक्के