>> दिव्या नेरुरकर–सौदागर
भावंडांमधील असुरक्षिततेची, तुलनेची भावना जर का पालकांकडून दूर केली गेली नाही, तर ती पुढे त्या दोन भावंडांमध्ये मत्सर निर्माण करू शकते. तसंही लहान मुलांना गैरसमज कुठल्याही कारणाने होऊ शकतात आणि लहान वयात त्यांच्यात परिपक्वता नसते. मग त्याच त्याच गैरसमजांची शृंखला कधी मने कलुषित करते हे त्यांनाही समजत नाही.
मिहीरने (नाव बदलले आहे) समुपदेशन घेण्याचे निश्चित केलेलेच होते आणि तसे घरी सांगूनच तो सत्रांसाठी येणार होता. “मला राग भरपूर येतो,’’ असे सांगताच त्याने स्वतविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. “मी व्यवसायाने आर्टिस्ट आहे आणि माझा स्वतचा स्टुडिओ आहे. तसा बघायला गेलं तर मी सेटल आहे आणि लग्नही करतोय. माझ्या मैत्रिणीसोबतच मी लग्न करायचं ठरवलेलं आहे. आमच्या दोघांच्याही घरच्यांची लग्नाला संमती असल्यामुळे तिथेही काळजी नाही. माझ्या घरी आई-वडील आहेत आणि दोघेही सुशिक्षित, नोकरदार आहेत,’’ अशी जुजबी माहिती मिहीर देत होता.
‘‘तू एकुलता एक आहेस तर…’’ असे छेडल्यावर तो एकदम शांत झाला. नजर चुकवत म्हणाला, “मला एक लहान भाऊ आहे. तो मला जराही आवडत नाही. त्याची आणि माझी कधी वेव्हलेंग्थ जुळलीच नाही.’’ एवढे बोलून तो गप्प बसला.
‘‘का?’’ असे त्याला विचारताच तो म्हणाला, “मला त्याच्याबाबत खूप राग आहे,’’ आणि परत गप्प बसला.
मिहीरला त्याच्या भावाबाबत ज्या काही भावना होत्या, त्या बहुतांशी नकारात्मक होत्या आणि तो ज्या रागाबाबत बोलत होता तो असूयेपोटीच तयार झालेला असावा असे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. ती समस्या होती त्याची त्याच्या भावंडासोबत असलेली स्पर्धा म्हणजेच ‘सिबलिंग राईव्हलरी’, जी तो मोठा झाल्यावरही त्याला आणि (कदाचित) त्याच्या लहान भावालाही भेडसावत होती.
बरेचदा आपला समज असतो की, भावंडांमधली ही अशी भांडणे, एकमेकांवर कुरघोडी करणे किंवा एकमेकांची खिल्ली उडवणे हे लहान वयापर्यंतच मर्यादित असते. त्यामुळे पालक “मोठी होतील दोघं तेव्हा समजून घेतील’’ अशा समजात दोन (किंवा अधिक) भावंडांमध्ये लक्ष घालत नाहीत. मग हीच भांडणे पुढे गंभीर समस्येचे स्वरूप धारण करू शकतात.
घरांतल्या समस्यांबाबत म्हणजेच कौटुंबिक कलहाच्या तोडग्यासाठी जेव्हा समुपदेशन घेतले जाते तेव्हा बऱयाच घरांमध्ये ‘भावंडांमधला दुरावा’ हे महत्त्वाचे कारण बघितले गेले आहे. ज्याचे मूळ लहानपणापासून भावंडांमध्ये सुरू झालेल्या असूयेमध्ये दडलेले आहे. आता ही असूया एकाच घरात जन्मलेल्या भावंडांमध्ये कशी येते? याचे उत्तर मात्र त्या-त्या घरातच दडलेले असते.
मुख्यत असे बघण्यात आले आहे की, पहिल्या मुलाच्या मनातली असूया दुसरे मूल आईच्या पोटात असल्यापासून असू शकते. “आता आपल्याला आई कधी मिळणार नाही’’ हा विचार पहिल्या मुलाच्या मनात रुजतो तो घरात किंवा नातेवाईकांच्या मस्करीतून. मग हे मूल कुठेतरी मनात असुरक्षित होते आणि दुसऱया भावंडाच्या जन्मानंतर त्याच्या मनातली असुरक्षितता वाढीला लागून त्याचे पर्यवसान रागात, दुःखात होते. इथेच आई-वडिलांची भूमिका महत्त्वाची ठरते. कारण असुरक्षिततेची, तुलनेची भावना जर का पालकांकडून दूर केली गेली नाही, तर ती पुढे त्या दोन भावंडांमध्ये मत्सर निर्माण करू शकते. तसेही लहान मुलांना गैरसमज कुठल्याही कारणाने होऊ शकतात आणि लहान वयात त्यांच्यात परिपक्वता नसते. मग त्याच त्याच गैरसमजांची शृंखला कधी मने कलुषित करते हे त्यांनाही समजत नाही. मिहीरच्या बाबतीत असेच काहीसे घडत होते. त्याच्याशी बोलताना एक लक्षात येत होते की, त्याच्या लहान भावाची आणि त्याची सतत शारीरिक पातळीवर तुलना केली गेलेली होती. मिहीरचे खाणे पहिल्यापासूनच कमी आणि तो खाण्यामध्ये चुझी होता. या उलट त्याच्या लहान भावाचे काहीही नखरे नव्हते. त्यामुळे त्याची आई मिहीरवर खाण्याच्या बाबतीत चिडायची आणि त्याची तुलना लहान भावाबरोबर करायची. लहान भावाचे खाण्याचे लाड होत आणि मिहीरच्या बाबतीत त्याच्या आई-वडिलांना हे दर वेळेस शक्य होत नसे. हे सगळे नातेवाईकांपासून लपून राहिले नव्हते. मग ही तुलना कळत नकळत त्यांच्याकडूनही होऊ लागली आणि मिहीर दुखावला गेला. त्यामुळे प्रत्यक्ष दोन भावंडांमध्ये दुरावा वाढीस लागला. मिहीरचे चिडणे वाढले आणि दोघे भाऊ हळूहळू दुरावायला लागले. त्याच्या भावाने त्याच्या जवळ येण्याचे प्रयत्न केले. मात्र मिहीरने गैरसमजांची शाल पांघरून घेतली होती.
‘‘तुला तुझ्या भावाबरोबर नातं निर्माण करायचं आहे का?’’ या प्रश्नावर तो एकदम चपापला. “कदाचित हो! कारण माझ्या होणाऱया बायकोच्या घरी मी तिचं आणि तिच्या लहान भावाचं नातं बघितलं आणि कुठेतरी मी स्वतला पारखू लागलो. तिची आणि तिच्या भावाचीही तुलना झालेली होती, पण त्या दोघांनी त्यांच्या नात्यावर परिणाम होऊ दिला नव्हता. माझ्या आयुष्यात सगळंच चांगलं चालू आहे आणि माझा भाऊ तर अजून कितीतरी लहान आहे. मग मी माझ्या बाजूने काही गोष्टींवर काम केलं तर कदाचित आमचं नातं तयार होऊ शकेल?’’ या सगळ्याच प्रश्नांच्या उत्तरासाठी मी काऊन्सिलिंग घेण्याचे ठरवले, हे सांगताना त्याच्या चेहऱयावर पहिल्यांदा शांत आणि मोकळे भाव होते.
मिहीरने स्वतच्या रागाचे मूळ सत्रांद्वारे शोधून काढले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, त्याचा राग हा लहानपणापासून टोकाचे विचार केल्यामुळे होता. अजून एक महत्त्वाचे म्हणजे त्याच्या ‘मी’पणामुळेही तो पुढाकार घेत नव्हता. त्यामुळेच त्याच्या ‘मी’पणाच्या कल्पनांनासुद्धा आव्हान दिले गेले. उदा. माझ्या लहान भावाने मला मान दिलाच पाहिजे या अहंच्या कल्पनेला “मी जर त्याच्याशी बोलून पाहिलं तर…’’ अशा विचारांनी आव्हान दिले गेले म्हणजेच मिहीरलाच पुढाकार घेण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले.
हळूहळू या सर्वाचा योग्य तो परिणाम त्याच्यावर दिसायला लागला होता. मिहीरच्या चेहऱयावरील आठय़ांची जागा आता मोकळ्या हास्याने घेतली होती. त्याच्या शेवटच्या सत्रात त्याने हेही सांगितले की, त्याच्या लग्नाची काही खरेदी तो स्वतच्या भावाबरोबर करणार आहे. आता खऱया अर्थाने त्या दोन भावंडांमधली ‘राइव्हलरी’ संपून त्या दोघांमध्ये ‘को-ऑपरेशन’ सुरू झाले होते.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)