कारवाईची भीती दाखवत व्हेरिफिकेशनच्या नावाखाली तरुणीच्या बँक खात्याचा तपशील घेऊन तिच्या खात्यातून पैसे काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार तरुणीला गुरुवारी एका कुरिअर कंपनीच्या नावे फोन आला. इराणला जे पार्सल पाठवले आहे, त्या पार्सलमध्ये एलएसडी ड्रग, लॅपटॉप आणि काही वस्तू आहेत. सायबर विभागात फोन ट्रान्सफर करत असल्याचे सांगून त्याने फोन कट केला. त्यानंतर तरुणीला पुन्हा एकाचा फोन आला. फोनवर बोलणाऱ्या दोघांनी त्यांची नावे प्रदीप सावंत आणि मिलिंद भारंबे अशी सांगितली. तुमच्या आयडीचा गैरवापर होत असून त्याचे व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे अशा भूलथापा मारल्या. fिव्हडीओ कॉलवर ठगाने तरुणीकडे तिच्या बँक खात्याची माहिती मागितली. तसेच मेसेजवर आलेला ओटीपी हा व्हेरिफिकेशनसाठी घेतला. ओटीपी शेअर करताच महिलेच्या खात्यातून 1 लाख 52 हजार रुपये काढले गेले. याबाबत तिने ठगांना विचारणा केली. त्या खात्यातील पैसे अवैध प्रकारचे आहेत. ते पैसे आरबीआयच्या माध्यमातून तपासले जातील आणि त्यानंतर ते पैसे पुन्हा खात्यात येतील असे सांगून ठगाने फोन कट केला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली.