कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोकण भवन येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी कोकण भवन कार्यालयाचा परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला.
26 जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किशोर जैन यांना गुरुवारी एबी फॉर्म दिल्यानंतर जैन यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना उपनेते विजय कदम, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, अनिल नवगणे, सुरेंद्र म्हात्रे, मनोहर भोईर, विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, संपर्कप्रमुख बबन पाटील, विष्णू पाटील, शेकापचे आस्वाद पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, महिला आघाडीच्या दीपश्री पोटपह्डे, स्वीटी गिरासे, युवासेना सहसचिव अवचित राऊत, दीपक निकम, प्रदीप ठाकूर, योगेश तांडेल, रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, ज्ञानेश्वर बडे, संदीप तांडेल, दीपक घरत, पराग मोहिते, प्रवीण जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
परिवर्तन अटळ; बदल घडणारच!
कोकण पदवीधर मतदारसंघात बदल घडवण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास किशोर जैन यांनी व्यक्त केला. कोकणातून आलेली कार्यकर्त्यांची गर्दी शिवसेना जिंकणारच याची ग्वाही देत आहे असे सांगतानाच लढत ही महाविकास आघाडी आणि महायुतीतच होईल, असे जैन यांनी ठामपणे सांगितले.
भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांचा जशास तसा जवाब
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज भरण्यासाठी आज हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्याचवेळी भाजपकडून अर्ज भरण्यासाठी निरंजन डावखरेही कार्यकर्त्यांसह आले होते. त्यांनी शिवसैनिकांना पाहताच मोदी.. मोदीचे नारे देण्यास सुरुवात केली. त्याला शिवसैनिकांनी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला… शिवसेना झिंदाबाद.. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… अशा घोषणा देत जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपचे कार्यकर्ते अंगावर येण्याचा प्रयत्न करू लागताच शिवसैनिक त्यांना भिडले, परंतु सुरक्षारक्षकांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखले. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.