बोइंग यानातून तिसऱयांदा अंतराळ प्रवासाला निघालेल्या हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांच्या चेहऱयावरचा आनंद ओसंडून वाहत आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओत सुनीता विल्यम्स नाचताना दिसत आहेत. डान्स करताना सुनीता विल्यम्स यांनी अंतराळवीरांना मिठीसुद्धा मारली. सुनीता यांचा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये स्पेस स्टेशनवर पोहोचल्यावर घंटा वाजते. वास्तविक, आयएसएसची परंपरा आहे की, जेव्हा जेव्हा एखादा नवीन अंतराळवीर तेथे येतो तेव्हा इतर अंतराळवीर घंटा वाजवून त्याचे स्वागत करतात. आयएसएस माझ्यासाठी दुसऱया घरासारखे आहे, असे सुनीता विल्यम्स म्हणाल्या. त्यांनी सर्व अंतराळवीरांचे अप्रतिम स्वागताबद्दल आभारही मानले.
बोइंगचे स्पेसक्राफ्ट एसयूव्ही-स्टारलाइनर डिझाइन करण्यातही सुनीता यांनी मदत केली. हे यान 7 क्रू मेंबर्स घेऊन जाऊ शकते. अंतराळ यान तयार झाल्यानंतर सुनीता विल्यम्स यांनी यानाला पॅलिप्सो असे नाव दिले. ही मोहीम यशस्वी झाल्यास इतिहासात प्रथमच अमेरिकेकडे अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यासाठी दोन अंतराळ याने असतील.
26 तासांनंतर यान अंतराळात
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे अंतराळ यान प्रक्षेपणानंतर 26 तासांनी गुरुवारी रात्री 11ः01 वाजता अंतराळ स्थानकावर पोहोचले. विल्मोर आणि विल्यम्स स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट आणि त्याच्या उपप्रणालीची चाचणी घेण्यासाठी सुमारे एक आठवडा स्पेस स्टेशनवर राहतील.