>> काशीनाथ माटल
राष्ट्रीय मिल मजदूर संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी वयाच्या 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने त्यांनी गेल्या 40 वर्षांत कामगार, सहकार, शिक्षण,सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांचा 8 जून रोजी मुंबईत अमृत महोत्सवी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समारंभाचे अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते आमदार सचिन अहिर भूषविणार आहेत.1950 मध्ये कोकणात चिपळुणातील ‘कुंभार्ली’ या खेडेगावातील गरीब कुटुंबात मोहिते यांचे बालपण गेले. 1967 मध्ये मुंबईतील खटाव मिलमधून कामगार म्हणून त्यांनी करीअरला आरंभ केला. कष्ट आणि जिद्द या जोरावर शिक्षण पूर्ण केले. गिरणी कामगार चळवळीच्या ओढीतून आणि कामगार महर्षी गं. द. आंबेकर यांच्या गांधी विचारांच्या प्रेरणेतून ते संघटनेच्या लढय़ात सहभागी झाले. तेथे प्रथम प्रतिनिधी, त्यानंतर संघटन सेक्रेटरी, सेक्रेटरी, उपाध्यक्ष पदापर्यंत निवडून आले. आज ते संघटन काwशल्याच्या सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. एनटीसी गिरण्यांतील कंत्राटी कामगारांना कायम करण्यात आणि मुंबईसह देशातील 23 बंद एनटीसी गिरण्या चालू करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर जो यशस्वी लढा उभा राहिला, त्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. इतर पदाधिकाऱयांचे योगदानही तेवढेच मोलाचे ठरले आहे. स्वतः खेळाडू असलेल्या गोविंदराव मोहिते यांनी कबड्डी, शूटिंगबॉल, शरीरसौष्ठवसारख्या मैदानी खेळांबरोबरच पॅरम, बुद्धिबळ स्पर्धांमधून राष्ट्रीय खेळाडू घडविण्याचे मोठे काम ते करीत आहेत. राष्ट्रीय मजदूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून सहकार चळवळीत आणि जी.डी.आंबेकर कॉलेजच्या शैक्षणिक कार्यातही त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. त्यांच्या कामातून संघटनेला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे.