Nagar News : पाण्यासाठी महिला आक्रमक; नेवासेकरांनी नगरपंचायतीवर काढला हंडा मोर्चा

नेवासा शहराला प्रवरासंगम येथून पाणी पुरवठा केला जातो. पाण्याची उपलब्धता असून सुद्धा नेवासेकरांना आठ ते पंधरा दिवस पिण्याची पाणी मिळत नाही. नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे नागरिकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहेत. याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी समर्पण फाउंडेशनच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात आला होता.

प्रवरासंगम येथे पुरेसा पाणीसाठा असून सुद्धा आठ ते पंधरा दिवस उलटून गेले तरी नेवासेकरांना पिण्याचे पाणी मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार शंकरा गढाख मित्र मंडळ यांनी प्रशासक तथा तहसीलदार यांनी तसे निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतू प्रशासनाच्या वतीने कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागिराकांनी समर्पण फाउंडेशनच्या वतीने हंडा मोर्चा काढला. सकाळी अकरा वाजल्यापासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करण सिंह घुले यांनी काही मागण्या केल्या होत्या. नेवासा शहरास पाणीपुरवठा योजने करता असलेल्या स्वतंत्र वीजपुरवठ्यासाठी दिलेले इतर कनेक्शन हटवले जावेत, त्यासाठी वीज वितरण कंपनी बरोबर आणि जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात यावेत. असे लेखी आश्वासन देण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. वीजपुरवठा सुरळीत राहिल्यास तसेच तांत्रिक अडचण न आल्यास नेवासा शहराला दिवसाआड आणि उपनगरास चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्वत: घेत असल्याचे नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी ठेंबरे यांनी सांगितले आणि तसे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान आंदोलन समाप्त करण्यात आले.

आंदोलनात महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे महिलांच्या भोजनाची व्यवस्था समर्पण फाउंडेशनने आंदोलनस्थळी केली होती. यावेळी मोठ्या प्रभारी मुख्याधिकारी ठोंबरे, प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी सौ म्हात्रे, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कानडे तसेच नेवासा शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.