संसदेसमोरून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गांधीजींचा पुतळा हटवला

संसदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळे हटवून अन्यत्र हलवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली ही कृती करण्यात आली आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी संसदेच्या आवारातील पह्टो एक्सवर पोस्ट करत ही संतापजनक बाब समोर आणली. हा अॅट्रॉसिटीचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर तीव्र आक्षेप घेतला. सरकारने हे पुतळे हटवून तमाम देशवासियांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी ही बाब उघडकीस यावी यासारखी दुर्दैवी बाब नाही, याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.

लोकसभा सचिवालय म्हणते…

संसदेच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी हे पुतळे होते. त्यामुळे व्हिजिटर्सना हे पुतळे पाहण्यात अडथळे येत होते. म्हणूनच हे सगळे पुतळे हटवून एकाच ठिकाणी उभारण्यात येत आहेत. ते स्थान प्रेरणास्थळ म्हणून विकसित केले जात आहे, असे स्पष्टीकरण यावर लोकसभा सचिवालयाकडून देण्यात आले.

महाराष्ट्रात पराभव झाल्याचा भाजपने राग काढला ः काँग्रेस

महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपला मतदान केले नाही यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे संसदेसमोरील मूळ जागेवरून हटवण्यात आले, असा आरोप काँग्रेसचे मीडिया प्रमुख पवन खेरा यांनी केला. गुजरातमध्येही सर्व जागा न मिळाल्याच्या रागापोटी महात्मा गांधींचा पुतळा मूळ जागेवरून हटवला असल्याचे ते म्हणाले.