अगदी छोटय़ा कामांसाठीही पालिकेच्या कार्यालयांत हेलपाटे घालाव्या लागणाऱया मुंबईकरांना आता वॉर्डातील रुग्णालय, शाळा, प्रसुतिगृह, बाजार, उद्यान, नळ जोडणी, लोकसंख्या अशा प्रकारची माहिती अगदी एका क्षणात उपलब्ध होणार आहे. यासाठी पालिकेच्या 25 वॉर्डात आता डिजिटल डिस्प्ले प्रदर्शित केला जाणार आहे. या ठिकाणी क्यूआर कोड स्पॅन केल्यास नागरिकांना सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे.
एप्रिलमध्ये आयुक्त भूषण गगराणी यांनी एम (पश्चिम) विभागातील नागरी सुविधा केंद्राला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी विविध सोयीसुविधा डिजिटल मदत फलकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशांनुसार, उप आयुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनात आणि संचालक शरद उघडे यांच्या सहकार्याने के (पूर्व) विभाग कार्यालयामध्ये प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल माहिती फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत.
या सुविधांची माहिती मिळणार
n या मदत फलकावर पालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱया सोयीसुविधा; विभागातील (वॉर्ड) लोकसंख्या, उद्याने, बाजार, रुग्णालये, प्रसुतिगृह, शाळा, जलतरण तलाव, परिरक्षण चौकी माहिती; जनजागृतीपर चित्रफिती आदी प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
n शिवाय जन्म-मृत्यू, अंत्यविधी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आदींची प्रक्रिया; प्लंबर परवाना, फेरीवाला अनुज्ञापत्र, कूपनलिका परवानगी, प्रक्षेपक अनुज्ञापत्र, कारंजे परवानगी, रस्त्यावरील मंडप /व्यासपीठ परवानगी, मलनिःसारण जोडणीची माहिती मिळेल.
n तसेच राडारोडा उचलणे, मालमत्ता करभरणा, दुकाने व आस्थापनांची नोंदणी, नळजोडणी आदींच्या प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. सोबतच क्यूआर कोडही देण्यात आले असून नागरिक त्यांना अपेक्षित असलेली माहिती हा क्यूआर कोड स्कॅन करून प्राप्त करू शकतात.