मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीसांची Zoomवरून हजेरी; मीडियाशी काहीही न बोलता दिल्लीला रवाना

devendra-fadnavis

Lok Sabha Election 2024 मध्ये 400 पारच्या बाता मारणाऱ्या Bharatiya Janata Party (भाजप)ची प्रचंड मोठी घसरण झाली. 272 या बहुमताच्या आकड्यापासून ते दूर राहिले. यामध्ये महाराष्ट्राचा मोठा हात आहे. महाराष्ट्रात भाजपला 9 जागा मिळाल्या. 2019 च्या तुलनेत ही कामगिरी अगदी सुमार ठरली. यामुळे फडणवीसांची चांगलीच गोची झाली. अखेर पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी राजीनाम्याची तयारी देखील दर्शवली. त्यांनतर भाजपमधील अस्वस्थता समोर आली.

अशातच देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून देखील आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहिले नाहीत. त्यावरून चर्चांना उधाण आलं. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीतून बाहेर पडल्यानंतर फडणवीसांच्या हजेरीबद्दलची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस हे नागपूरला असल्याने इथे नसले तरी त्यांनी Zoom वरून (ऑनलाइन) हजेरी लावली, अशी माहिती दिली.

तर दुसरीकडे फडणवीस तीन-साडेतीनच्या सुमारास नागपूर विमानतळावर पोहोचले. ते दिल्लीला रवाना झाले. त्यावेळी उपस्थित असलेल्या मीडियानं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीसांनी केवळ हात जोडून काही न बोलता विमानतळात प्रवेश केला.

दिल्लीत अमित शहांची भेट

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर अमित शहांनी त्यांना फोन करून बोलवल्याची चर्चा आहे. आज ते दिल्लीला रवाना झाले असून अमित शहांची भेट घेतील असं बोललं जात आहे. यानंतर ते खरंच राजीनामा देणार की पदावर कायम राहणार याचा निर्णय होईल असं बोललं जात आहे.