बेदरकार आलिशान मोटार चालवून दोघांचा जीव घेणाऱया कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा बालसुधारगृहातील मुक्काम 12 जूनपर्यंत वाढला आहे. त्याचे व्यसनाधीनतेबाबत समुपदेशन करण्यात येत आहे. सुधारगृहातून सुटका झाल्यास त्याच्या जीविताला धोका आहे, अशी माहिती सरकारी वकील आणि पोलिसांनी बाल न्याय मंडळाला दिली.
पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन आरोपीला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठविण्याचा आदेश मंडळाने यापूर्वी दिला होता. मुदत संपत असल्याने पोलिसांनी मुलाला आणखी काही दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज सोमवारी (दि. 3) दाखल केला. गुह्याचे तपास अधिकारी असलेले सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी हा अर्ज केला होता. या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत मंडळाचे न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांनी मुलाची रवानगी बालसुधारगृहात केली.
अपघात घडल्यानंतर त्याच दिवशी अल्पवयीन मुलाला जामीन देण्यात आला होता. त्यानंतर या गुह्यात विविध प्रकारचे कट तयार करण्यात आले व त्यातून तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तो बाहेर राहिल्यास तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा पुराव्यांत छेडछाड होऊ शकते. ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन मुलाचा सुधारगृहातील मुक्काम आणखी 14 दिवस वाढविण्यात यावा, अशी मागणी तपास अधिकारी सुनील तांबे यांनी मंडळाला केली. या प्रकरणाचा तपास प्रगतिपथावर असून, आम्ही मुदतीत अहवाल सादर करणार आहोत. मुलावर प्रौढ म्हणून खटला चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची आम्ही पूर्तता करीत आहोत, असे त्यांनी न्यायालयास सांगितले. दरम्यान, मुलाचे मानसोपचार तज्ञांकडून समुपदेशन करण्यात येत आहे, त्याचे सत्र अद्याप पूर्ण झालेले नाही. मुलाची आत्ताची परिस्थिती विचारात घेता त्याला आणखी समुपदेशनाची गरज आहे. त्याला व्यसनाधीनतेपासून दूर करण्यासाठी मार्गदर्शनदेखील करण्यात येत आहे, असा युक्तिवाद मंडळातील विशेष सहायक सरकारी वकील मोनाली काळे यांनी केला, तर मुलाच्या बालसुधारगृहातील मुदतवाढीला त्याचे वकील प्रशांत पाटील यांनी विरोध केला.
मुलाचा ताबा मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार
बालसुधारगृहातून सुटका झाल्यानंतर मुलाचा ताबा अगरवाल कुटुंबीयांचे कौटुंबिक मित्र असलेल्या एका कुटुंबाकडे द्यावा, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी सोमवारी मंडळात दाखल केला आहे. हे कुटुंबीय अगरवाल राहत असलेल्या परिसरातच राहायला आहे. मंडळातून सुटका झाल्यानंतर मुलाचा ताबा कोणाकडे द्यायचा आहे, त्यांची नावे द्यावीत, अशी सूचना मंडळाने मुलाच्या कुटुंबीयांच्या वकिलांना केली आहे. मुलाचा त्याचा रक्ताच्या नात्यातील सदस्यांकडे ताबा देता येणार नाही. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीची नावे द्यावीत, असे मंडळाने सूचित केले होते. त्यानुसार ही नावे देण्यात आली आहेत; मात्र आता त्या कुटुंबाला मुलाचा ताबा मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.