लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा धुव्वा उडाला आहे. खास करून 45 प्लसचा नारा देणाऱ्या भाजपचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवानंतर आता महाराष्ट्र भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री तथा भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये आणि त्याचबरोबर महायुतीमधील अंतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीत भाजपने सर्वाधिक सर्वाधिक 28 जागा लढल्या. तर शिंदे गटाने 15 आणि अजित पवार गटाने 4 जागा लढल्या. पण महाराष्ट्रात निवडणुकीच्या निकालात महायुतीचा मोठा पराभव झाला. महाविकास आघाडीने निवडणुकीत एकूण 30 जागा जिंकल्या. यात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 9, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 9 आणि काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. निवडणुकीत 45 प्लसचा दावा करणाऱ्या महाराष्ट्र भाजपचा दारूण पराभव झाला आहे. या निकालनंतर आता महाराष्ट्र भाजपमधील अस्वस्थता समोर आली आहे.
भाजप नेत्यांचे चेहरे पडलेले
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे बडे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. निवडणुकीचे निकाल लागत असताना काल दिवसभर गायब असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. निवडणुकीत अपयश आल्याची कबुली देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात भाजपमधून या निवडणुकीचं नेतृत्व मी करत असल्याने पराभवाची संपूर्ण जबाबदारी ही माझी आहे. ही जबाबदारी मी स्वीकारतो. कुठेतरी मी स्वतः यात कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात जो काही सेटबॅक सहन करावा लागला, याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो. विधानसभेसाठी पूर्णवेळ मला उतरायचं आहे. त्यामुळे मला सरकारमधून मोकळं करावं, ही माझी पक्ष नेतृत्वाला विनंती आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल सावे, प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे आणखी काही नेते आणि पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी भाजप नेत्यांचे चेहरे पडलेले आणि चिंताग्रस्त दिसत होते. त्यांची घालमेल चेहऱ्यावर दिसून येत होती.
बावनकुळे, शेलारांची अचानक पत्रकार परिषद
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा मोठा फटका महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला बसण्याची चिन्ह आहेत. देश पातळीवर भाजपमध्ये मोठे फेरबदल होतील, अशी चर्चा आहे. यामुळे राज्यातील भाजप नेत्यांमध्ये मोठी चलबिचल असल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होताच काही वेळातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली. भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी फडणवीसांशी चर्चा केल्याचे बावनकुळे आणि शेलार यांनी सांगितले. यावरून भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता समोर आल्याचे चित्र आहे.