मंत्र्यांना पराभूत करण्याचा इतिहास कायम; चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर ठरल्या जायंट किलर

लोकसभा असो की विधानसभेची निवडणूक, चंद्रपुरात आजवर कॅबिनेट मंत्र्यांना पराभूत करण्याचा धानोरकर कुटुंबीयांचा इतिहास राहिला आहे. या लोकसभा निवडणुकीतही सांस्कृतिक कार्यमंत्री भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाची धूळ चारत कॉँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर जायंट किलर ठरल्या आहेत.

शिवसेनेकडून 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक लढविताना बाळू धानोरकर यांनी तेव्हाचे पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री असणारे काँग्रेस उमेदवार संजय देवतळे यांचा पराभव केला होता. त्यानंतर बाळू धानोरकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपचे उमेदवार असणारे पेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभूत केले होते. मोदी लाटेत कॉँग्रेसची महाराष्ट्रातून ही एकमेव जागा निवडून आली होती.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा मतदारसंघातून निवडणूक लढवत माजी मंत्री भाजप उमेदवार संजय देवतळे यांचा पराभव केला होता. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर चंद्रपूरमधून लोकसभेची निवडणूक लढविणाऱया प्रतिभा धनोरकर यांनी पॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव केला.

मंत्र्यांचा पराभव करण्याची धानोरकर कुटुंबाची परंपरा व इतिहास पुन्हा कायम राखला गेला आहे. मुनगंटीवार हे राज्यातील मोठे नेते असून त्यांना राजकारणाचा 30 ते 40 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना पराभूत करणे साधे नव्हते, अशी प्रतिक्रिया प्रतिभा धानोरकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.