हिंदुस्थानी क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अखेरचा रामराम ठोकला. या मराठमोळय़ा क्रिकेटपटूने सोशल मीडियावर पोस्ट करत क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. या पोस्टमध्ये केदारने आपल्या क्रिकेट कारकीर्दीचा एक स्लाईड शो शेअर करून त्याला किशोर कुमारच्या एका भावूक गाण्याचे बॅगराऊंडही दिले आहे.
महाराष्ट्राच्या 39 वर्षीय केदार जाधवने 2020 मध्ये ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध हिंदुस्थानी संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. इंग्लंडमधील 2019 च्या वन डे वर्ल्ड कपमध्येही केदार हा हिंदुस्थानी संघाचा भाग होता. महेद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अष्टपैलू कामगिरी करण्याची संधी मिळाली. केदारने आपल्या पोस्टमध्ये कारकीर्दीत पाठिंबा देणाऱया सर्वांचे आभार मानले. पुण्यातील केदार जाधवने टीम इंडियासाठी 73 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. केदार आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अखेरचा आयपीएल खेळताना दिसला होता. यादरम्यान केदार जिओ सिनेमासाठी मराठीत समालोचन करताना दिसला.
View this post on Instagram