कथित दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने सोमवारी बीआरएस नेते के कविता यांची न्यायालयीन कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवली. याच प्रकरणातील अन्य तीन आरोपी – प्रिन्स, अरविंद आणि दामोदर यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टानं एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
कविता यांना सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी कोठडी वाढवली. 29 मे रोजी बीआरएस नेत्याविरुद्ध आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध प्रॉडक्शन वॉरंट जारी केले होते.
यापूर्वी, दिल्ली न्यायालयाने या खटल्यातील त्यांची जामीन याचिका नाकारली होती. त्यावेळी म्हटलं होतं की कविता या साक्षीदारांवर प्रभाव पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होत्या आणि जर दिलासा मिळाला तर त्या असे करत राहण्याची शक्यता होती.
मद्य धोरण प्रकरणी ED आणि CBI ने दाखल केलेल्या दोन खटल्यांमध्ये कविता या न्यायालयीन कोठडीत आहेत. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या त्या कन्या आहेत. कविता यांना ED ने 15 मार्च रोजी हैदराबाद येथील बंजारा हिल्स येथील निवासस्थानातून अटक केली होती. त्यानंतर त्यांना सीबीआयने तिहार तुरुंगातून अटक केली होती.
कविता आणि आप नेत्यांनी मद्य धोरणातून फायदा मिळवून देण्याचा कट रचल्याचा दावा ED ने केला आहे. यंत्रणेने मद्य धोरणातील त्रुटी दाखवल्या आहेत.