शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू झालेला ठाणे रेल्वे स्थानकातील मेगाब्लॉक आज अखेर तीन तास आधीच ‘अनलॉक’ झाला. तळपत्या उन्हात 400 मजुरांनी प्रचंड मेहनत करून फलाट रुंदीकरणाचे काम फत्ते केले. त्यामुळे ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 व 6 प्रशस्त झाला असून लोकलकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. आज सकाळी 10.30 वाजता फलाट रुंदीकरणाचे काम पूर्ण होताच सर्वांनी सुटकेचा निŠश्वास टाकला. या कामासाठी पाच पोकलेन, 32 टँक व्हॅगन, चार लोकोमोटिव्ह अशी भलीमोठी यंत्रसामग्री तैनात केली होती. ठाण्याहून कसाऱयाकडे जाणारी पहिली टॅक ट्रेन सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी सुटताच कर्मचाऱयांनी हिप हिप हु।़।़र्रे असा गजर जल्लोष केला.
सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातून पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करत असतात. विशेषतः फलाट क्रमांक 5 व 6 हा सतत गजबजलेला असतो. या स्थानकातून 300 हून उपनगरीय लोकल तसेच मेल व एक्प्रेस गाडय़ा ये-जा करतात. दिवसेंदिवस गाडय़ा व प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र सध्याच्या फलाटाची रुंदी अतिशय कमी होती. ती वाढवण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते आज दुपारी 3.30 वाजेपर्यंत 63 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. रेल्वेचे 15 वरिष्ठ अभियंता, 10 कंत्राटदार व मजुरांच्या विविध टीमने नियोजित वेळेआधीच कामगिरी पूर्ण केली. आता फलाटाची रुंदी अडीच ते तीन मीटरने वाढवण्यात आली आहे.
प्री-कास्ट ब्लॉकचा प्रथमच वापर
फलाटाची रुंदी वाढवण्याकरिता मध्य रेल्वेचे अधिकारी तसेच अभियंत्यांनी अत्याधुनिक अशी यंत्रणा वापरली. विशेषतः प्रथमच प्री-कास्ट ब्लॉक्सचा वापर केला. अचूक नियोजन, मजुरांची अहोरात्र मेहनत, अधिकाऱयांची देखरेख आणि आधुनिकतेची जोड यामुळे ठाणे स्थानकातील काम रेल्वेच्या इतिहासातील मैलाचा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी व्यक्त केला आहे.
फूटओव्हर ब्रिज पाडला
ठाणे स्थानकातील फलाटाच्या रुंदीकरणाचे काम करण्यासाठी आवश्यक ती जागा मिळणे गरजेचे होते. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आलेला फूटओव्हर ब्रिज पाडण्यात आला. या संपूर्ण मेगाब्लॉकची वेळ आज दुपारी 3.30 वाजेपर्यंत होती, पण त्यापूर्वीच संपूर्ण काम मार्गी लावण्यात आले.