मे महिन्यात 23 तारखेपासून सुरू झालेल्या नवतपाने नावाप्रमाणे अक्षरशः लोकांच्या नाकीनऊ आणले. आज शेवटच्या दिवशीसुद्धा सकाळपासून ढगाळ, आभाळी वातावरण असूनही दमट उकाडय़ाने नागरिकांना चांगलेच छळले. ढगाळीमुळे तापमान मात्र मोठ्या फरकाने खाली घसरले. नवतपा आता संपला आहे व त्याबरोबर उन्हाचा त्रासही संपेल, अशी अपेक्षा करता येईल. आज तापमान कमी झाले, आज सर्वाधिक तापमान यवतमाळ 45 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिह्यात सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले होते. त्यामुळे बहुतेक जिह्याचे तापमान 3 ते 6 अंशाच्या मोठ्या फरकाने खाली घसरले. नागपूरला शनिवारी 45.4 अंशावर असलेला पारा रविवारी 41.8 अंशावर येत सरासरीच्याही खाली गेला. ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक 6 अंशाने पारा खाली घसरत 40.5 अंशावर आला. भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातही कमाल तापमान 3 ते 4 अंशाने खाली येत 40 अंशावर थांबले. चंद्रपूर व अकोल्यात आंशिक घट झाली. यामध्ये यवतमाळला शनिवारी रात्री पावसाच्या हलक्या सरी येऊनही रविवारी तापमान सर्वाधिक 45 अंशावर वाढले आहे. दिवसाचा पारा घसरला असला तरी रात्रीचे तापमान वधारले असून नागरिकांना रात्री उष्ण लहरींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.