केबिन क्रूला मारहाण करून विमानाचा दरवाजा उघडण्याचा केला प्रयत्न

कालिकत ते बहारीन प्रवासादरम्यान प्रवाशाने केबिन क्रूला मारहाण करून विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहार पोलिसांनी अब्दुल मुसावीर नाडूपंडीईल या प्रवाशाला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

अब्दुल हा मूळचा केरळचा रहिवासी आहे. तो शनिवारी कालिकत ते बहारीन असा विमान प्रवास करत होता. विमान प्रवास सुरू झाल्यावर अब्दुल अचानक उठला. त्यानंतर तो विमानाच्या मागच्या बाजूला गेला व केबिन क्रूला तो मारहाण करू लागला.

मारहाण केल्यानंतर त्याने विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसऱया केबिन क्रूने अब्दुलला पकडून सीटवर नेऊन बसवले. एवढय़ावर न थांबता अब्दुलले शेजारी बसलेल्या प्रवाशांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच पुन्हा विमानाचा दरवाजा उघडणार अशी तो धमकी देत होता. त्याला केबिन क्रू शांत बसण्यास सांगत होते. अब्दुल हा विमानाचा दरवाजा उघडण्यासाठी जाऊ लागला. सुरक्षेला धोका असल्याचे वाटल्याने वैमानिकाने विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवले. याची माहिती एअर इंडिया एक्स्प्रेसच्या सुरक्षा अधिकाऱयांना दिली. सुरक्षा अधिकाऱयाने अब्दुलला ताब्यात घेऊन सहार पोलीस ठाण्यात आणले. अब्दुलविरोधात एअरक्राफ्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अब्दुलला अटक केली.

गुप्तचर यंत्रणा करणार तपास

अब्दुल हा केरळचा रहिवासी आहे. त्याने कोणत्या कारणासाठी विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला याचा तपास आता गुप्तचर विभाग (आयबी) करणार आहे. अब्दुल हा कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत का, त्याच्याविरोधात कोणते गुन्हे दाखल आहेत का, हेदेखील तपासले जाणार आहे.