निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यापूर्वी पोस्टल बॅलट्सद्वारे करण्यात आलेल्या मतांची मोजणी करायची आहे. परंतु, निवडणूक आयोगाने एक गाइडलाइन आणून हा नियमच बदलून टाकला आहे, हेराफेरी करून अक्षरशः कायदा वाकवला आहे, असा आरोप इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने केला असून पोस्टल बॅलटचा निकाल आधी जाहीर करा अशी मागणी आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याची भेट घेऊन केली.
शिष्टमंडळात अभिषेक मनू सिंघवी, डी राजा, राम गोपाल यादव, संजय यादव, नासिर हुसैन, सलमान खुर्शीद आणि सीताराम येचुरी यांचा समावेश होता. अनेकदा लोकसभा निवडणुकीच्या निकालात पोस्टल बॅलेट्समधील मते निर्णायक ठरल्याचे शिष्टमंडळाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अभिषेक मनू सिंघवी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.. बॅलेट्समधील मतांमुळे सर्वच पक्षांच्या मतांमध्ये फरक दिसला आहे. हा फरक दोन ते तीनपट असतो, असे दिसून आले आहे. पोस्टल बॅलेट्सच्या मतांची मोजणी सर्वात आधी करावी असे निवडणूक आयोगाचा एक नियम सांगतो. अनेकदा चिठ्ठयांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने हा नियम सांगितला आहे. तसेच जोपर्यंत बॅलेट्समतील मजमोजणी पूर्ण होऊन निकाल ईव्हीएममधील मतांची मोजणी तोपर्यंत बंद करता येणार नाही किंवा ईव्हीएमचा निकाल सांगता येणार नाही जोपर्यंत बॅलेट्सचा निकाल घोषित होत नाही, याकडे सिंघवी यांनी लक्ष वेधले.
जुन्या नियमांचेच पालन झाले पाहिजे
निवडणूक आयोगाला एक गाईडलाइन आणून नियम बदलता येणार नाहीत. कायद्यानुसार हे चुकीचे आहे. नव्या गाइडलाईननुसार आता बॅलेट्समधील मतांची मोजणी पूर्ण होण्याआधी ईव्हीएमचे निकाल जाहीर करता येऊ शकतात. परंतु, पोस्टल बॅलेटच्या निकालात हेराफेरी होऊ शकते. त्यामुळे पोस्टल बॅलेटमधील मतांजी आधी मोजणी व्हावी. कारण, लोकशाहीसाठी जुन्या नियमाचेच पालन होणे अत्यंत महत्वाचे आहे, असे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.
भाजपनेही घेतली निवडणुक आयोगाची भेट
इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळानेही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. निवडणूक आयोगातील प्रत्येक अधिकाऱ्याला निवडणूक प्रक्रीयेची इत्यंभूत माहिती असावी. तसेच मतमोजणी आणि निकालाच्या घोषणेची प्रक्रीया कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत झाली पाहिजे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याचा कांगावाभाजप नेते पीयूष गोयल यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला.
सतर्क राहा… काँग्रेसने उमेदवारांना दिल्या सूचना
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्षाचे सर्व उमेदवार, गटनेते आणि प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा केली. मतमोजणीवेळी सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी सर्वांना देण्यात आल्या.
इंडियाच्या मागण्या
नियमांनुसार मतमोजणी करा, पर्यवेक्षकांना हे नियम लागू करा.
मतमोजणी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली झाली पाहिजे. नियंत्रण विभागाची पडताळणी व्हावी.
ईव्हीएम मशीन डेटा कन्फर्म करावा.
ईव्हीएम जेव्हा सील करण्यात येते तेव्हा त्याचीही व्यवस्थित पडताळणी झाली पाहिजे. मजमोजणीच्या वेळी काऊंटींग एजंटद्वारे त्याची पुन्हा पडताळणी करावी.
मतमोजणी प्रतिनिधींसाठी सिब्बल यांचा ऍलर्ट
मतमोजणीतील हेराफेरीची दाट शक्यता पाहता काँग्रेसचे राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या मतमोजणी प्रतिनिधींसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी त्यांनी एक चार्टही जारी केला आहे.
सीरियल नंबर, उमेदवारांची नावे, झालेले एकूण मतदान हे सगळं नीट जाणून घ्या.
सगळ्या शंका दूर झाल्यानंतरच रिझल्ट बटण दाबण्याची परवानगी द्या. निकालाचे बटण दाबल्यानंतर मतदानाची तारीख बरोबर आहे का हे तपासा.
मतदानाची सुरुवात आणि मतदान संपल्याची वेळही अचूक आहे की नाही हे पाहा.
– पूर्वी जेमतेम हजारभर पोस्टल मते असायची पण यावेळी 85 वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांगांनाही घरातून मतदानाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात पोस्टल मतांची संख्या 4 ते 5 हजार असू शकते. जिथे अटीतटीची लढाई आहे तिथे ही मते निकाल बदलू शकतात. त्यामुळे आयोगाने याचा विचार करावा. आयोगाच्या नव्या आदेशानुसार ही मते ईव्हीएममधील मतांची मोजणी झाल्यानंतरही मोजली जाऊ शकतात. अशावेळी हेराफेरी होऊ शकते, अशी भीती सिब्बल यांनी व्यक्त केली.
मतमोजणीवेळी फॉर्म 17 सी पाहून नेमकी किती मते पडलीत हे तपासा. मतदानाशी संबंधित फॉर्मवरील प्रत्येक गोष्ट बारकाईने वाचा.
मतमोजणी टेबलवर ईव्हीएम सुरू करताच त्यावरील तारीख आणि वेळ पाहा. त्यात तफावत आढळल्यास मशीन सील केल्यानंतर पुन्हा सुरू केले गेले होते हे स्पष्ट होते. त्याबाबत आक्षेप नोंदवा.
कंट्रोल युनिट नंबर, बॅलेट युनिट नंबर, पेपर सील, व्हीव्हीपॅट आयडी नंबर या सगळ्या गोष्टी जुळत आहेत का ते तपासा.