केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतचा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. त्याबाबत विचारले असता भाजप हरत आहे, आमचा विजय निश्चित आहे, हेच यावरून दिसून येते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. तसेच भाजप आणि शहा यांच्यावर हल्लाबोलही केला.
भाजपकडून देशातील जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भाजप या निवडणूकीत हरत असल्याचे स्पष्ट होत आहे. देशातील गोदी मिडीयाने भाजपचा निर्देशांप्रमाणे एक्झीट पोल तयार केला आणि प्रसारीत केला. त्यामुळे जनतेच्या मनात रोष आहे. हा रोष 4 तारखेला मतपेट्या उघडतील तेव्हा स्पष्ट होईल. आमचा विजय निश्चत आहे, हे मंगळवारी दिसून येणार आहे. कार्यकर्त्यांनी मतमोजणीकडे लक्ष द्यावे. शेवटच्या मशीनची मतमोजणी होईपर्यंत त्यांनी जागा सोडू नये. या निवडणुकीत महाराष्ट्रात 35 ते 40 जागा आम्हीच जिंकू, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.