लोकसभा निवडणूकीचे मतदानाचे सातही टप्पे पार पडल्यानंतर वृत्तवाहिन्या आणि एजन्सीजचे एक्झिट पोल जाहीर झाले. या एक्झिटपोलमध्ये एनडीएला बहुमत मिळाले असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र आम आदमी पार्टीचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी मात्र एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरणार असून जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करून घेईन अशी घोषणा केली आहे. सोमनाथ भारती यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली आहे.
”माझे शब्द लिहून ठेवा. जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी माझे मुंडन करून घेईन. चार जूनला सर्व एक्झिट पोल खोटे ठरणार असून मोदीजी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत. दिल्लीत इंडिया आघाडीला सातही जागा मिळणार आहेत. मोदींच्या भितीने एक्झिट पोल वाल्यांनी त्यांना हरताना दाखवले नाही. त्यामुळे आपल्याला 4 जूनपर्यंत खरे आकडे समोर येईपर्यंत थांबावे लागणार आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात भाजप विरोधात मतदान केलं आहे”, असे सोमनाथ भारती यांनी ट्विट केले आहे.
इंडिया जिंकणार हा जनतेचा सर्व्हे
इंडिया आघाडी किमान 295 जागा जिंकणार आहे. त्यापेक्षा कमी जागा येणार नाहीत. हा आमचा सर्व्हे नाही तर जनतेचाच सर्व्हे आहे. सरकारी सर्व्हे होतच असतात. त्यांच्याकडे आकडे लावण्याचे आणि बिघडवण्याचे तंत्र पहिल्यापासूनच आहे. त्यांचे मीडियातले दोस्त आकडे रंगवून सांगतात. म्हणूनच सत्य काय आहे आणि जनतेच्या मनात काय आहे हे मी तुम्हाला सांगत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.