आपल्या जमिनीवरील बेकायदेशीर होर्डिंग हटवण्यासाठी म्हाडाने आता कंबर कसली आहे. म्हाडाची एनओसी नसलेले 60 बेकायदेशीर होर्डिंग प्राधिकरणाच्या रडारवर असून या होर्डिंगचा परवाना रद्द करून ते तत्काळ हटविण्यात यावे, याबाबतचे पत्र म्हाडातर्फे पालिकेला पाठविण्यात आल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू तर 74 जण जखमी झाले होते. त्यामुळे मुंबईतील होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या म्हाडाने तातडीने आपल्या जागेवरील होर्डिंगचे सर्वेक्षण केले. विशेष म्हणजे, आपल्या जमिनीवर किती होर्डिंग्ज आहेत याचा आकडाच म्हाडाकडे उपलब्ध नसल्यामुळे प्राधिकरणाचा मोठय़ा प्रमाणात महसूल बुडत होता. नुकत्याच केलेल्या पाहणीत म्हाडाच्या जमिनीवर एकूण 62 होर्डिंग्ज आढळले असून त्यापैकी केवळ दोनच होर्डिंगला म्हाडाने एनओसी दिली आहे. त्यामुळे बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी म्हाडा आता अॅक्शन मोडवर आली आहे.
…तर आम्हीच होर्डिंग हटवू
म्हाडाच्या जागेवर होर्डिंग उभारण्यासाठी पालिकेच्या परवानगीसह जागामालक म्हणून म्हाडाची एनओसी घेणे बंधनकारक आहे. म्हाडाच्या एनओसीशिवाय उभारलेले होर्डिंग आमच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत. यासंदर्भात आम्ही पालिकेला पत्र पाठवत म्हाडाच्या जमिनीवरील बेकायदेशीर होर्डिंगचा परवाना रद्द करून ते तत्काळ हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा आम्ही ती उखडून टाकू आणि कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करू, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. तसेच जे होर्डिंगसाठी आता एनओसी घेतील त्यांच्याकडून होर्डिंग उभारल्यापासूनचे भाडे आणि त्यावरील व्याज वसूल केले जाईल, असेही अधिकाऱयाने सांगितले.