अजित पवार यांची भूमिका संशयास्पद, गुन्हेगाराला वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर! संजय राऊत यांचा गंभीर आरोप

पुण्यातील पोर्शे कार अपघातात दोन जणांचा नाहक जीव गेला असताना या प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. गुन्हेगाराला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री अजित पवार यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज केला.

कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा विषय लावून धरत गुन्हेगारांना जनतेसमोर आणला. गुन्हेगारांचा पर्दाफाश केला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत असल्याचेही ते म्हणाले. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी काही लोकांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचे ते म्हणाले. या अपघात प्रकरणात स्थानिक आमदार सुनील टिंगरे आणि ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागातील सर्व कर्मचाऱयांना गुंतवण्यात आल्याचेही ते म्हणाले. शिंदे, फडणवीस, अजित पवार एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत. ज्याने मद्यप्राशन करून दोन खून केले, त्याला वाचवण्यासाठी यांनी सरकारी यंत्रणेचा कसा वापर केला ते आता समोर येऊ लागले आहे. यामध्ये आमदार धंगेकर यांचा वाटा मोठा आहे. यासाठी त्यांनी गेले अनेक दिवस संघर्ष केला आणि हे प्रकरण चव्हाटय़ावर आणले. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.

कॅमेरे लावून कुणी ध्यानधारणा करतो का?
शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकात ध्यानधारणा केली, मात्र ही ध्यानधारणा करताना तब्बल 27 कॅमेरे त्यांची छबी वेगवेगळय़ा अँगलमधून टिपत होते. हा लोकसाधनेचा अपमान असल्याचे सांगत कॅमेरे लावून कुणी ध्यानधारणा करतो का? असा सणसणीत टोला खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. पंतप्रधान तब्बल तीन हजार सुरक्षा रक्षक घेऊन ध्यानधारणा करीत आहेत. या परिसरात लोकांना यायला बंदीही घालण्यात आली आहे. पूर्वीचे लोक अशाप्रकारे सिक्युरिटी घेऊन ध्यानधारणा करीत होते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.