जुहूच्या ‘एसएनडीटी’ पुलावर सिमेंटचा राडारोडा टाकणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पालिकेने तपासणीत कंत्राटदाराने बेजबाबदारपणे राडारोडा टाकल्याचे समोर आल्यामुळे हा दंड आकारण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून क्लीनअप मार्शलचीही नेमणूक करण्यात येत आहे. शिवाय भरारी पथकाच्या माध्यमातून अस्वच्छता करणाऱयांवर, राडारोडा टाकणाऱ्यांवर आणि उघडय़ावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये जुहू येथील एसएनडीटी महाविद्यालयासमोरील पूल वाहतुकीसाठी खुला होऊन तीन वर्षे होत आली.
या पुलावर स्वच्छता राखण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची होती, मात्र पुलावर राडारोडा मोठय़ा प्रमाणात टाकल्याचे निदर्शनास आले. यावेळी पूल विभागातील अधिकाऱयांनी 50 हजार रुपये दंड आकारण्यात यावा असे स्पष्ट केले, परंतु कंत्राटदारास धडा शिकवणे आणि पुन्हा अशी गोष्ट करू नये यासाठी तब्बल एक लाख रुपये दंड आकारण्यात आल्याचे बांगर यांनी सांगितले.