ते वक्तव्य संविधान बदलाच्या चर्चांना बळ देणारं, अमोल मिटकरींची मेधा कुलकर्णीवर टीका

भाजप नेत्या मेधा कुलकर्णी व अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात सध्या शा‍ब्दिक युद्ध सुरू झाले आहे. मेधा कुलकर्णी यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका केल्यानंतर आता मिटकरी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ”एका विशिष्ट समाजाची बाजू घेऊन जर मेधा कुलकर्णी बोलणार असतील तर लोक जी भीती व्यक्त करत आहेत की संविधान बदललं जाईल त्या चर्चांना हे वक्तव्य बळ देणारं आहे”, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.

शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना मेधा कुलकर्णी यांनी अमोल मिटकरी यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली होती. ””ब्राह्मण समाज अतिशय साधा समाज आहे. मात्र विनाकारण जर कुणी आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर त्याला सोडायचं नाही. मध्यंतरी बारामती येथील एका कार्यक्रमात अमोल मिटकरी येणार होते. मिटकरींनी पुरोहितांची, आपल्या मंत्रांची चेष्ठा केली होती. ते येणार आहे हे समजल्यावर मी त्यांच्यासोबत स्टेजवर बसणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती”, असं त्या सांगली येथील कार्यक्रमात केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी संविधान बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा दिली. ”लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहं भारतीय संविधानाच्या चौकटीत येतात. ज्यावेळेस या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा कुणी व्यक्ती सदस्य होतो त्यावेळेस त्याला जी शपथ दिली असते ती महत्त्वाची असते. खासदारकीची शपथ दिल्यानंतर तो सदस्य कुठल्याही एका समाजाचा राहात नाही तो देशाचा होतो. जर शपथ घेतल्यानंतर आपण एका समाजापुरते आहोत असं कुणी वागत असेल तर भारतीय संविधानाच्या विचारधारेला ते छेद देण्यासारखं आहे. असाच प्रकार सांगलीत राज्यसभेच्या खासदारांकडून घडला”, असे अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.