आरक्षण विरोधकांना विधानसभेत पाडणार, जरांगे पुन्हा आक्रमक

मराठा समाजासाठी सगेसोयऱयांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही किंवा मराठय़ांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण विरोधकांना पाडणार असल्याची घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, सर्व 288 जागा लढवणार असल्याचे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाकरिता सगेसोयऱयांच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी येत्या 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोथरूड येथील एका गुह्यामध्ये मनोज जरांगे-पाटील यांना समन्स बजावण्यात आले होते. हे समन्स रद्द करण्यासाठी जरांगे-पाटील हे आज शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी न्यायालयाच्या बाहेर जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.