>> शिल्पा सुर्वे, [email protected]
आपला देश म्हणजे सांस्कृतिक वारसासंपन्न भूमी आहे. हाताने विणलेल्या कापडापासून मातीला आकार देण्यापर्यंतच्या प्रत्येक कलेतून वैविध्यपूर्ण निसर्ग आणि परंपरा यांचे धागे गुंफलेले दिसतात. हिंदुस्थानातील हस्तकला केवळ सौंदर्याची वस्तू नाही, तर प्रत्येक क्राफ्टमागे एक कथा असते. ती त्या प्रदेशाचा इतिहास, परंपरा आणि मूल्ये प्रतिबिंबित करते. सांस्कृतिक विविधता टिकवण्यासाठी आणि कलात्मक वारशाचे जतन करण्यासाठी या हस्तकलांचे जतन करणे आज काळाची गरज आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात पारंपरिक हस्तकला शतकानुशतके जोपासल्या जात आहेत. ग्रामीण भागातील कुशल कारागीर कलेसाठी जीवन समर्पित करतात. त्यांना पारंपरिक तंत्राची सखोल माहिती असते. अनेक आव्हानांना तोंड देत ते कला जोपासत असतात. मात्र त्यांच्या कलेला म्हणावा तसा मोबादला मिळत नाही. अनेक पारंपरिक कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या कला आणि कारागिरांना संजीवनी देण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे ‘स्वदेश’ प्रदर्शन आयोजित केले आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील नीता अंबानी कल्चर सेंटर येथे ‘स्वदेश’ प्रदर्शन सुरू आहे. अस्सल मातीतील कलाकार आपली कला कशी जोपासतात? ती कला प्रत्यक्ष कशी आकार घेते? त्यामागील कुशल हात कोणाचे आहेत? हे जाणून घेण्याची संधी ‘स्वदेश’ प्रदर्शनातून मिळते. रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि संचालक नीता अंबानी यांच्या प्रयत्नाने देशातील विविध कलांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वदेश’ प्रदर्शनात पश्चिम बंगालची बालुचरी साडी, आंध्र-तेलंगणाची गुट्टापुसलू ज्वेलरी, आंध्रची हॅण्ड पेटेंट कलमकारी, गुजरातचे अजरख, मणिपूरची लाँगपी पॉटरी, कश्मीरची काल बाफी कार्पेट आणि सोझनी अॅब्रोयडरी अशा सात कलांची दालने आहेत. प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे तिथे हातमागावर विणकाम होताना प्रत्यक्ष पाहायला मिळते.
यातील काही कलाप्रकारांबद्दल सांगायचे तर बालुचरी साडय़ा हातमागावर विणकाम करून तयार केल्या जातात. पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबाद जिह्यात बालुचरी साडय़ांची 500 वर्षे जुनी परंपरा आहे. साडय़ांवर पौराणिक कथा विणल्या जातात. त्यामागे अपार मेहनत असते. आठ-आठ तास बसून अवघ्या दोन-तीन इंचाचे विणकाम होते. त्यामुळे कारागिरांची पुढची पिढी या कलेत फारसा रस घेत नसल्याचे कारागीर सांगतात.
अजरख ही गुजरातची लोकप्रिय हस्तकला आहे. अजरखच्या साडय़ांना खूप मागणी असते. ही कला म्हणजे लाकडी ब्लॉक हॅण्ड प्रिंटिंग वर्क्स आहे. वॉशिंग, डाइंग अशा 16 टप्प्यांतून जात अजरख प्रिंटचे कापड तयार होते. हस्तकलेच्या सुंदर प्रिंटसाठी आज अजरखपूर गाव ओळखले जाते. अजरखपूरचे कारागिरी आपली पारंपरिक कला इतरांना शिकवतात. अनेक फॅशन डिझायनरचे विद्यार्थी त्यांच्याकडे कला शिकायला येतात. ही कला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कारागिरांनी सांगितले.
कश्मीरची ‘काल बाफी’ ही 15 व्या शतकातील हाताने गालिचा तयार करण्याची कला आहे. ही मूळची पर्शियन कला असून लोकर आणि सिल्क धाग्याचा वापर करून गालिचे तयार केला जातात. आंध्रची हॅण्ड पेटेंट कलमकारी कलादेखील खास आहे. यामध्ये कापडावर ड्रॉईंग आणि पेंटिंग केले जाते. त्यासाठी ‘कलम’चा म्हणजे पेनचा वापर केला जातो. त्यावरून या कलेला ‘कलमकारी’ म्हटले जाते. आदिवासी गोंड समाजाची गोंड कला सांस्कृतिक परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.
या कला पुढे नेण्यासाठी त्यांना योग्य मार्केट मिळणे गरजेचे आहे. अपुरा मोबदला, मार्केटिंग-ओळखीचा अभाव, नवी पिढी रोजगारासाठी अन्यत्र वळणे, अशी आव्हाने या कारागिरांसमोर आहेत. ‘स्वदेश’ या प्रदर्शनातून या कारागिरांना उपजीविकेचा आणि कलेचा प्रसार करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. कारागिरांचे हात बळकट करण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. काळाच्या ओघात लुप्त होणाऱया उत्कृष्ट कारागिरीचा खजिना आपण जपला पाहिजे तरच आपले जीवन आणि भावी पिढय़ा कलासंपन्न होतील.