सामना अग्रलेख – सीमेवरील कारवाया, चीनविरुद्ध शेळी का?

पाकिस्तानला इशारे देताना मोदींची 56 इंची छाती फुगते खरी, पण वेळ चिनी ड्रॅगनला इशारे देण्याची आली की, ती तेवढीच आत जाते. अरुणाचलच्या सीमाभागात चीनने वसविलेल्या गावांची संख्या 600 च्या वर गेली आहे ती त्यामुळेच. कुंभकर्ण निदान सहा महिन्यांनी जागा होत होता. मोदी तर चिनी कारवायांचे नगारे जोरजोरात वाजत असूनही जागे व्हायला तयार नाहीत. उलट ते कन्याकुमारी येथे ‘ध्यान’ वगैरे करीत आहेत. देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत आणि मोदी ‘ध्यान’मग्न आहेत. जनतेला ‘ध्यान’ नको तर सीमेवर सुरू असलेल्या शेजारी राष्ट्रांच्या कारवायांवर लक्ष ठेवणारे राज्यकर्ते हवे आहेत. पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? असा प्रश्न जनतेला पडला आहे. मोदीजी, जाता जाता तरी या प्रश्नाचे उत्तर जनतेला द्याल का?

मोदी सरकार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मश्गूल होते आणि तिकडे चीन आपल्या सीमेवर गावेच्या गावे वसवत असल्याचे उघड झाले. एवढेच नव्हे तर सिक्कीमपासून दीडशे किलोमीटर्सवर चीनने त्याची लढाऊ विमानेदेखील तैनात केली आहेत. कश्मीर सीमेवरही तो देश पाकिस्तानच्या मदतीसाठी बंकर्स उभारत आहे, पक्के रस्ते बांधत आहे. हिंदुस्थानी सीमेवरील चीनच्या कुरापती नवीन नाहीत. प्रश्न आहे तो स्वतःला देशाचे एकमेव रक्षणकर्ते वगैरे म्हणवून घेणाऱ्या मोदींचा आणि त्यांच्या सरकारचा. मागील चार वर्षांपासून सीमेवरील दुर्गम भागात चीन गावे वसवत आहे. आतापर्यंत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 600 च्या वर गावे चिन्यांनी अरुणाचल प्रदेशजवळील सीमाभागात निर्माण केली आहेत. ही कृत्रिम गावे काही त्यांनी पर्यटनासाठी उभारलेली नाहीत. त्यांचा वापर तो देश हिंदुस्थानविरोधात लष्करी कारवाईसाठी करणार हे उघड आहे. कारण त्यापैकी अनेक गावांमध्ये सैन्यासाठी लागणाऱ्या सुविधाही निर्माण करण्यात आल्या आहेत. या कृत्रिम चिनी गावांची बोंब याआधीही झाली होती. परंतु एरवी पाकिस्तानवर गुरगुरणारे मोदी सरकार त्याबाबत गप्पच राहिले. त्यामुळे आधी 30 च्या घरात असलेल्या त्या गावांची संख्या आता पार 600 च्या पुढे गेली आहे. चीन लडाखमध्ये भारतीय हद्दीत हजारो किलोमीटर

घुसखोरी

करतो. सोनम वांगचुक यांच्यासारखे समाजसेवक त्याचा स्फोट’ करतात, पण तरीही मोदी, त्यांचे गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या कानांचे पडदे हलत नाहीत. अरुणाचलच्या सीमेवर चीन गावेच्या गावे वसवतो, त्यांना चिनी, तिबेटी आणि रोमन भाषेत नावेदेखील देतो आणि आमचे परराष्ट्रमंत्री ‘चीनने फक्त नावेच बदलली. मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते आमचे होईल का?’ असे तर्कट मांडून विषय सोडून देतात. गलवानच्या खोऱ्यात आमचे बहादूर जवान चिनी सैनिकांना ‘दे माय धरणी ठाय’ करतात आणि मोदी सीमेवरील जवानांसोबत ‘दिवाळी’ साजरी करण्याचे नाटक करतात. चीन आपल्या अरुणाचल प्रदेशवर दावा ठोकतो, तो दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे जाहीर करतो आणि मोदी सरकार फक्त निषेधाचे शाब्दिक बुडबुडे हवेत सोडते. सत्तरेक वर्षांपूर्वी वाटाघाटींचा भाग म्हणून कुठले एक बेट श्रीलंकेला दिले म्हणून काँग्रेसच्या नावाने कंठशोष करणारे मोदी त्यांच्या कार्यकाळातील चिनी कुरापतींबाबत मौन बाळगतात. मणिपूरमधील हिंसाचारात चिनी हस्तक्षेपाचे पुरावे समोर येऊनही त्यांची 56 इंची छाती जराही थरथरली नाही. जे ईशान्येकडील सीमांचे तेच कश्मीर सीमेचे. मोदी सरकार 370 कलम हटविल्याच्या बढाया मारते, परंतु जम्मू-कश्मीरलगतच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची संरक्षण सिद्धता मजबूत करण्यासाठी चीन ज्या उठाठेवी करत आहे त्याकडे कानाडोळा करते. गेल्या तीन वर्षांपासून त्या भागात चीन पाकड्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करीत आहे.

नियंत्रण रेषेलगत

त्यांनी कम्युनिकेशन टॉवर्स उभारले. बंकर्स बांधले. रडार यंत्रणा उभी केली. हे सगळे ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’मधील चिनी गुंतवणुकीच्या संरक्षणासाठी केले, असा कांगावा चीन करीत आहे. तथापि, त्यामागचा छुपा हेतू पाकड्यांची संरक्षण सज्जता वाढावी हाच आहे. देशाचे गृहमंत्री ऐन निवडणूक प्रचारात पाकव्याप्त कश्मीर घेण्याच्या वल्गना करतात, पण कश्मीर सीमेवरील चिनी आणि पाकिस्तानी कारवायांकडे डोळेझाक करतात. पाकिस्तानला इशारे देताना मोदींची 56 इंची छाती फुगते खरी, पण वेळ चिनी ड्रॅगनला इशारे देण्याची आली की, ती तेवढीच आत जाते. अरुणाचलच्या सीमाभागात चीनने वसविलेल्या गावांची संख्या 600 च्या वर गेली आहे ती त्यामुळेच. कश्मीरच्या नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानच्या मदतीसाठी चीन बंकर्स, कम्युनिकेशन टॉवर्स, रडार यंत्रणा उभारू शकला तेदेखील मोदी सरकार झोपलेले असल्याने. कुंभकर्ण निदान सहा महिन्यांनी जागा होत होता. मोदी तर चिनी कारवायांचे नगारे जोरजोरात वाजत असूनही जागे व्हायला तयार नाहीत. उलट ते कन्याकुमारी येथे ‘ध्यान’ वगैरे करीत आहेत. देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत आणि मोदी ‘ध्यान’मग्न आहेत. जनतेला ‘ध्यान’ नको तर सीमेवर सुरू असलेल्या शेजारी राष्ट्रांच्या कारवायांवर लक्ष ठेवणारे राज्यकर्ते हवे आहेत. पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? असा प्रश्न जनतेला पडला आहे. मोदीजी, जाता जाता तरी या प्रश्नाचे उत्तर जनतेला द्याल का?