>> सचिन कावडे
हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या बंगल्यातून चंदनचोरी करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेला महिना उलटला. स्वत: जिल्हाधिकार्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यात कानात चंदनचोरीची गोष्ट सांगितली. त्यानंतर महिनाभरापासून तपास तरबेज पोलीस अधिकारी सीसीटीव्हीत दिसणार्या दोन अस्पष्ट चेहर्यांचा शोध घेत आहेत!
हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे ‘समर्पण’ हे शासकीय निवासस्थान साईबाबा मंदिराशेजारी आहे. बंगल्यात प्रशस्त लॉन असून, वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. यात चंदनाच्या झाडांचाही समावेश आहे. बंगल्याच्या सुरक्षेसाठी पोलीसही तैनात असतात. 18 आणि 19 एप्रिल रोजी बंगल्याची साफसफाई करण्यासाठी दोन खासगी कामगारांना बोलावण्यात आले होते. साफसफाईचे काम सुरू असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास चंदनचोरांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची सुरक्षा भेदून चंदनचोर लिलया बंगल्यात शिरले, चंदनाच्या बुंध्यातून गाभा काढण्याचा प्रयत्न चोरांनी केला. परंतु गाभा काढता न आल्याने हे चोर आल्यापावली परतही गेले! चोर आले आणि गेले पण पोलिसांना त्याचा थांगपत्ताही लागला नाही.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर दिसले
बंगल्याच्या आवारात चोर शिरले त्यांनी चंदनचोरी करण्याचा प्रयत्न केला. बंगल्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार वैâद झाला. सीसीटीव्हीचे फुटेज पाहून जिल्हाधिकारी पापळकर थक्क झाले. त्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या कानावर हा प्रकार घातला आणि चौकशीचे आदेश दिले. या चंदनचोरीचा तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. महिनाभरापासून पाटील सीसीटीव्ही फुटेज पाहून थकले आहेत. साफसफाईसाठी आलेल्या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. पण चंदनचोर काही सापडले नाहीत.
पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली – जिल्हाधिकारी पापळकर
निवासस्थानाच्या परिसरात चंदनाची अनेक छोटी-मोठी झाडे आहेत. या झाडांमधील गाभा काढण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्याला काही मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या गडबडीत असल्यामुळे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे तक्रार दिली होती. पुढे या प्रकरणात काय झाले ? याची माहिती घेतली नसल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे – पोलीस अधीक्षक जी. श्रीधर
जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील चंदनाच्या झाडातील गाभा काढण्याचा प्रयत्न करणार्या चंदनतस्करांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना आदेशित केले आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.