पालिकेच्या शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असतानाही काही ठिकाणी राजरोसपणे पान टपऱया थाटून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते. याची गंभीर दखल घेत पालिका शाळांच्या 100 मीटर परिसरातील टपऱया-दुकानांची तपासणी शाळा सुरू होण्याआधी 15 जूनपर्यंत करण्यात येणार आहे. यात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱया दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
मुंबईत अनेक शाळा नागरी वस्तीच्या परिसरात आहेत. शिवाय बहुतांशी ठिकाणी शाळा बाजार, दुकानांनी वेढलेल्या आहेत. या दुकाने, स्टॉलमध्ये काही ठिकाणी तंबाखू, गुटखा सर्रास विकला जातो. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पालिकेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
27 टक्के जनता तंबाखूच्या आहारी
महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या 27 टक्के जनता कोणत्या ना कोणत्या मार्गाने तंबाखूच्या आहारी गेल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे, तर मुंबईत हेच प्रमाण 15 टक्के आहे.