होर्डिंग दुर्घटना; आणखी एक अटकेत

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी आणखी एकाला क्राईम ब्रँचच्या युनिट- 7 ने अटक केली. मनोज रामकृष्ण संघू असे त्याचे नाव आहे. त्याने ते होर्डिंगसाठी स्टॅबिलिटी प्रमाणपत्र दिले होते. होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. संघूला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास क्राईम ब्रँचची एसआयटी करत आहे. होर्डिंगला स्टॅबिलिटीचे प्रमाणपत्र देणाऱया मनोजचा पोलीस शोध घेत होते. अखेर आज सायंकाळी पोलिसांनी मनोजला अटक केली. पालिकेने काही इंजिनीअरना स्टॅबिलिटी प्रमाणपत्र देण्यासाठी परवानगी दिली आहे. दुर्घटनाग्रस्त होर्डिंगला मनोजने 2023 मध्ये स्टॅबिलिटी प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे मनोजने कोणत्या आधारावर ते प्रमाणपत्र दिले होते याचा तपास एसआयटी करत आहे. होर्डिंग दुर्घटनेत अटक केलेल्या भिंडेच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी भादंवि कलम 120 (ब ) कट रचणे या कलमाची वाढ केली आहे.