जया शेट्टी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; छोटा राजनला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Jaya Shetty Murder Case : गँगस्टर आणि कुख्यात डॉन छोटा राजनच्या बाबतीत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबईत 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या खून प्रकरणात छोटा राजनला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जया शेट्टी या मध्य मुंबईतील गमदेवी येथील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालक होत्या. त्यांना छोटा राजन टोळीकडून खंडणीचे फोन येत होते. धमक्यांमुळे महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना सुरक्षा दिली होती. त्यानंतर 4 मे 2001 रोजी दोघांनी  हॉटेलमध्ये गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती. हत्येच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.

छोटा राजन सध्या तुरुंगात आहे. त्याला बाली विमानतळावर अटक करून 2015 मध्ये हिंदुस्थानात आणण्यात आले होते. सध्या त्याला तिहार तुरुंग क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात आले आहे. एकेकाळी दाऊदचा जवळचा सहकारी समजल्या जाणाऱ्या छोटा राजनने 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊदशी संबंध तोडले होते. त्यांच्या या वैयक्तिक वादामुळे या दोन गटांमध्ये वारंवार हिंसक घटना घडल्या होत्या.

अनेक वर्षे तपास यंत्रणांच्या तावडीतून सुटल्यानंतर अखेर 2015 मध्ये छोटा राजनला ताब्यात घेण्यात आले. एका व्हॉट्सॲप कॉलनंतर त्याला अटक करण्यात आली. ज्यामध्ये अनवधानाने त्याचे लोकेशन उघड झाले. छोटा राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे.