फ्रान्ससोबत वाटाघाटी; हिंदुस्थान 26 राफेल-एम खरेदी करणार

 

हिंदुस्थानी नौदलाची पॉवर वाढवण्यासाठी सरकार फ्रान्सकडून 26 राफेल-एम लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. हिंदुस्थान आणि फ्रान्स या दोन देशांत यासंबंधी चर्चा करण्यासाठी फ्रान्स सरकार आणि डसॉल्ट कंपनीचे अधिकारी उद्या, गुरुवारी हिंदुस्थानात येणार आहेत. ते या करारावर संरक्षण मंत्रालयाच्या करार वाटाघाटी समितीशी चर्चा करणार आहेत. नौदलासाठी खरेदी केली जाणारी 22 सिंगल सीट राफेल-एम जेट आणि 4 डबल ट्रेनर सीट राफेल-एम जेट्स चीनचा मुकाबला करण्यासाठी हिंदी महासागरात तैनात केली जातील. फ्रान्स राफेल-एम जेट्ससह शस्त्रs, सिम्युलेटर, क्रूसाठी प्रशिक्षण आणि लॉजिस्टिक सपोर्टदेखील देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱयादरम्यान या कराराची पहिली माहिती समोर आली होती. यापूर्वी सप्टेंबर 2016 मध्ये 59 हजार कोटी रुपयांच्या मेगा डीलअंतर्गत हिंदुस्थानने हवाई दलासाठी फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी केली होती.